रोहितने विराटला केले ‘ओव्हरटेक’
आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत हिटमॅनची तिसऱ्या स्थानी झेप तर विराट चौथ्या स्थानावर : शुभमन गिल पहिल्या स्थानी
वृत्तसंस्था/ दुबई
पाकिस्तान आणि दुबईत नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने न्यूझीलंडला पराभूत करत विक्रमी तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. या जेतेपदाबरोबरच ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. सलामीवीर शुभमन गिलने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माने तिसरे स्थान पटकावले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीनंतर सलामीवीर शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम राहिला आहे, तर अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या हिटमॅनने किंग कोहलीला ओव्हरटेक करत तिसरे स्थान गाठले आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीत 218 धावा करणारा विराट कोहली फलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, टॉप-10 मध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश असून शुभमन रोहित व विराटसह श्रेयस अय्यरने आठवे स्थान पटकावले आहे. याशिवाय, न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरिल मिशेलने एका स्थानाने प्रगती करत सहाव्या स्थानावर झेप घेतली, तर रचिन रवींद्र सातत्यपूर्ण कामगिरीसह 14 व्या स्थानावर आला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत कुलदीपचा जलवा
गोलंदाजी क्रमावारीत न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने सहा स्थानांची झेप घेत थेट दुसरे स्थान गाठले आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 9 बळी मिळवत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. दुसरीकडे सँटनरचा संघ सहकारी मायकेल ब्रेसवेलनेही 10 स्थानांनी प्रगती करत 18 व्या स्थान मिळवले आहे. या ताज्या क्रमवारीत भारताची फिरकी जोडी कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजानेही आपला ठसा उमटवला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत सात बळी घेणाऱ्या कुलदीप यादवने तीन स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून, रवींद्र जडेजाने 10 वे स्थान मिळवले आहे.
सांघिक क्रमवारीत टीम इंडिया अव्वल
सांघिक क्रमवारीत भारत अव्वल स्थानी असून, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान अनुक्रमे दुस्रया आणि तिसऱ्या स्थानी आहेत. यामध्ये न्यूझीलंड चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानी आहेत.