For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित कंग्राळीने तेजस कोल्हापूरवर निकालवर चारीमुंड्या चित

09:55 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहित कंग्राळीने तेजस कोल्हापूरवर निकालवर चारीमुंड्या चित
Advertisement

कणबर्गी कुस्ती मैदान : अनेक चटकदार कुस्त्या निकाली

Advertisement

बेळगाव : कणबर्गी येथे हनुमान जयंतीनिमित्त कणबर्गी जय हनुमान कुस्तीगीर संघटना आयोजित कुस्ती मैदानात कंग्राळीच्या रोहित पाटीलने कोल्हापूरच्या तेजसचा 16 व्या मिनिटाला निकाल डावावरती चीत करून कणबर्गी मैदान मारले. यावेळी इतर चटकदार कुस्त्या निकाली झाल्या. कणबर्गी येथील प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान भरविले जाते. पण यावर्षी निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे परंपरा खंडित होऊ नये म्हणून साध्या प्रमाणात कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले. माजी नगरसेवक संजय सुंठकर व माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख कुस्ती बेळगावचा उगवता मल्ल रोहित पाटील कंग्राळी व तेजस पाटील कोल्हापूर ही कुस्ती टोप्पाण्णा बन्नोसी, बसवाण्णा बंडरगाळी, बसवाण्णा येळ्ळूरकर, अनिल येळ्ळूरकर, संजय सुंठकर, शिवाजी सुंठकर व जय हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटाला रोहित कंग्राळीने एकेरी पट काढीत तेजसला खाली घेऊन कब्जा मिळविला. पायाची सांड काढत घिस्सा मारण्याचा प्रयत्न रोहितने केला. पण अनुभवी तेजसने त्यातून सुटका करून घेतली. 6 व्या मिनिटाला तेजसने एकेरी पट काढून रोहितला खाली घेतले व मानेवरती घुटना ठेऊन घुटन्यावर चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून रोहितने चलाखीने सुटका करून घेतली. 10 व्या मिनिटाला रोहितने एकेरी पट काढून तेजसला खाली घेतले व पायाला एकलांगीवरून एकलांगीवर चीत करण्याचा प्रयत्न केला. पण एकलांगीवर रोहितला चीत करणे कठीण गेल्याने त्याने 14 व्या मिनिटाला निकाल डावावरती तेजसला चारीमुंड्या चीत करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती किसन कंग्राळी व संजू बेळगाव ही कुस्ती जय हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला किसन कंग्राळीने पायाला टाच मारून संजूवर कब्जा मिळविला. एकलांगी भरून संजूला चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. परंतु संजूचा कांही पाठीचा भाग जमिनीला न लागल्याने पंचांनी पुन्हा कुस्ती खेळण्याचा इशारा दिला. ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. वेळेअभावी कुस्ती बरोबरीत राहिली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती रोहित माचीगड व कुणाल अवचारहट्टी यांच्यात झाली. या कुस्तीत रोहित माचीगडने कुणाल अवचारहट्टीचा एकचाक डावावरती विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत आर्यन कंग्राळीने अभिषेक इंगळगीचा झोळी डावावरती पराभव केला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत अजित कडोली व नागेंद्र मलवाड या कुस्तीत अजित कडोलीने घिस्सा डावावरती विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाची कुस्ती यश कंग्राळी व रोहन येळ्ळूर ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. वेळेअभावी बरोबरीत सोडण्यात आली. सातव्या क्रमांकाची कुस्ती मंथन सांबराने साहिल पाटील कंग्राळीचा मोळी डावावरती पराभव केला. आठव्या क्रमांकाची कुस्ती यश कंग्राळीने चेतन येळ्ळूरचा निकाल डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाची कुस्ती श्री घाडीने साहिल पाटील कंग्राळीचा एकचाक डावावरती पराभव केला. दहावा क्रमांकाची कुस्ती प्रविण निलजीने किरण कंग्राळीचा घुटन्या डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे ओम घाडी, निखील शिनोळी, रोहित मास्कनहट्टी, पवन लहान कंग्राळी यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवरती मात करून विजय संपादन केला. आखाड्याचे पंच म्हणून फकीरा कंग्राळकर, पुंडलिक बन्नोसी, सतीश बन्नोसी, मारूती तुळजाई, गणपत बन्नोसी यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.