For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित, जडेजाचा शतकी धमाका

06:10 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहित  जडेजाचा शतकी धमाका
Advertisement

पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या 5 बाद 326 धावा : मुंबईकर सर्फराज खानचेही पदार्पणातच धमाकेदार अर्धशतक : मार्क वूडचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था /राजकोट

कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाची शानदार शतके आणि पदार्पणवीर सर्फराज खानच्या खणखणीत अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताने गाजवला. 3 बाद 33 अशी दयनीय अवस्था असताना पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 5 बाद 326 धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेर रवींद्र जडेजा 110 आणि कुलदीप यादव 1 धावावर खेळत आहेत.  सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (10), शुभमन गिल (0) व रजत पाटीदार (5) हे स्वस्तात बाद झाले.  सुरुवातीचे तीनही फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची 3 बाद 33 अशी स्थिती झाली होती. एकामागून एक विकेट्स पडत असताना कर्णधार रोहित शर्मा मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. यावेळी रवीद्र जडेजाला बढती देण्यात आली आणि ही गोष्ट भारतीय संघासाठी फायद्याची ठरली. रोहित आणि जडेजा या दोघांनी अनुभव पणाला लावत धावगतीला वेग द्यायला सुरुवात केली. या दोघांनी भारताच्या शतकाची वेस ओलांडली. हळूहळू दीडशतक आणि द्विशतकाचीही वेस ओलांडली आणि भारतीय संघ कसा आघाडीवर राहील, याची पूर्णपणे दक्षता घेतली.

Advertisement

रोहितची शानदार शतकी खेळी

खेळपट्टीवर सेट झालेल्या रोहितने शानदार खेळी साकारताना इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावताना त्याने 196 चेंडूत 14 चौकार व 3 षटकारासह 131 धावा केल्या. विशेष म्हणजे, रोहितने जडेजासोबत चौथ्या गड्यासाठी 204 धावांची भागीदारी साकारली. शतकानंतर आक्रमक खेळताना रोहित मार्क वूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.

सर्फराज खानचाही अर्धशतकी धमाका

रोहित बाद झाल्यानंतर जडेजा व मुंबईकर सर्फराज खानने भारताच्या डावाला आकार दिला. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या सर्फराज खानने पदार्पणाच्या सामन्यात 104.2 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकले. वनडे स्टाईल फलंदाजी करताना सर्फराजने 66 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 62 धावा फटकावल्या. दरम्यान, रवींद्र जडेजा देखील शतकाजवळ पोहोचला होता. मात्र शतकी धाव घेताना गोंधळ झाला अन् सर्फराज 62 धावांवर धावचीत झाला. दरम्यान, सर्फराजच्या वनडे स्टाईल अर्धशतकाने प्रेक्षक गॅलरीत बसलेले वडील आणि पत्नीचा उर अभिमानाने भरून आला होता.

जडेजाचे चौथे कसोटी शतक

सर्फराज बाद झाल्यानंतर पुढील चेंडूवर जडेजाने घरच्या मैदानावर चौथे कसोटी शतक साजरे केले. जडेजाने 212 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह नाबाद 110 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने 86 षटकांत 5 बाद 326 धावा केल्या होत्या. जडेजा 110 तर कुलदीप यादव 1 धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून मार्क वूडने 3 तर टॉम हार्टलेने 1 गडी बाद केला.

जडेजाच्या चुकीमुळे सर्फराज रनआऊट, रोहितचा संताप अनावर

आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सर्फराज खानने अर्धशतकी खेळी केली. या दरम्यान तो जडेजाच्या एका चुकीमुळे धावबाद झाला. वास्तविक, जडेजा 99 धावांवर फलंदाजी करत होता. त्याला शतकासाठी एक धाव हवी होती. पण ही एक धाव पूर्ण करण्याच्या नादात सर्फराज धावबाद झाला. 82 व्या षटकात अँडरसनच्या चेंडूवर जडेजाने मिडऑनला फटका खेळला. जडेजाने सर्फराजला सिंगलसाठी बोलावले. सर्फराज रनसाठी धावला पण जडेजाने नंतर सर्फराजला सिंगलसाठी नकार दिला. सर्फराज बराच पुढे आला होता. मार्क वूडने थेट स्टंपवर थ्रो मारून त्याला धावबाद केले. सर्फराज धावबाद झाल्यानंतर रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. रागाच्या भरात त्याने आपल्या डोक्यावरची कॅप काढून जोरात जमिनीवर भिरकावली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहितचे शतक अन् विक्रम अनेक

रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत फॉर्मशी झुंजत होता. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याने केवळ 90 धावा केल्या. अशा परिस्थितीत रोहितवर धावा करण्याचा दबाव होता. पण आता राजकोट कसोटीत रोहित वेगळ्याच लयीत दिसला. कठीण परिस्थितीत भारतीय कर्णधाराने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. या शतकी खेळीसह त्याने अनेक नवे विक्रमही आपल्या नावे केले.

  • पहिल्या दिवशी रोहित शर्माने 2 षटकार मारले. यानंतर रोहित कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला. रोहितने माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले. आता त्याच्या नावावर 79 षटकार आहेत, तर धोनीच्या नावावर 78 षटकार आहेत.
  • रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो नववा खेळाडू ठरला. या यादीत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
  • भारतासाठी कसोटी शतक करणाऱ्या सर्वात वयस्कर कर्णधारांचा विचार केला, तर रोहितने गुरुवारी विजय हजारे यांना पछाडले. कर्णधार विजय हजारे यांनी 1951 मध्ये इंग्लंडविरुद्ध 36 वर्ष आणि 278 दिवस वय असताना कसोटी शतक केले होते. आता रोहित या खास विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजय हजारे आहेत. 36 वर्ष 291 दिवस वय असताना रोहितने शतकी खेळी साकारली आहे.

सर्फराज खान व ध्रुव जुरेल यांचे कसोटी पदार्पण

राजकोट येथे खेळवण्यात येत असलेल्या इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून मुंबईकर सर्फराज खान व ध्रुव जुरेल यांनी कसोटी पदार्पण केले. या दोघांना संधी देताना अक्षर पटेल व मुकेश कुमार यांना संघातून वगळण्यात आले. दरम्यान, अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सर्फराजला दिली तर दिनेश कार्तिकने ध्रुवला पदार्पणाची कॅप दिली. कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सर्फराज हा 311 वा तर ध्रुव 312 वा खेळाडू आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत 86 षटकांत 5 बाद 326 (जैस्वाल 10, गिल 0, रोहित शर्मा 131, सर्फराज खान 62, जडेजा खेळत आहे 110, कुलदीप खेळत आहे 1, मार्क वूड 69 धावांत 3 बळी, हार्टले 1 बळी).

Advertisement
Tags :

.