रोहितने फेटाळल्या निवृत्तीविषयीच्या अटकळी
खराब फॉर्ममुळे सिडनी कसोटीतून अंग काढून घेतल्याचे केले स्पष्ट
वृत्तसंस्था/ सिडनी
भारताचा वरिष्ठ फलंदाज रोहित शर्माने शनिवारी त्याच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या. आपण ‘कुठेही जात नाही’ आणि ऑस्ट्रेलियाविऊद्ध सुरू असलेल्या सिडनी कसोटीतून अंग काढून घेण्याचे कारण हे खराब फॉर्म आहे, असे त्याने सांगितले. फॉर्म गमावलेल्या रोहितने सिडनी कसोटी विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला आणि त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. यामुळे त्याच्या भविष्याविषयी व्यापक अटकळी सुरू झाल्या आहेत.
‘मी निवृत्त झालेलो नाही. मी यावेळी अंग काढून घेतले आहे एवढेच मी म्हणेन. मुळात प्रशिक्षक आणि निवड समिती यांच्याशी झालेली चर्चा अगदी साधी होती. मी धावा करू शकत नाही, मी फॉर्मात नाही आणि हा एक महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे आम्हाला फॉर्मात असलेला खेळाडू हवा आहे, असे रोहितने स्टार स्पोर्ट्सला सांगितले. ‘आमच्या फलंदाजीचा विचार करता खेळाडूंचा फॉर्म तसा चांगला नाही. त्यामुळे संघात बरेच फॉर्मात नसलेले खेळाडू घेऊ शकत नाही. ही साधी गोष्ट माझ्या मनात घोळत होती. मी कुठेही जात नाही’, असे तो म्हणाला.
या 37 वर्षीय खेळाडूने सांगितले की, संघ व्यवस्थापन आणि निवडक समितीने त्याच्या निर्णयाचे समर्थन केले. मला प्रशिक्षक आणि निवड समितीला माझ्या मनात हेच चालले आहे, असे सांगायचे होते. त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, तुम्ही इतकी वर्षे खेळत आहात. तुम्ही काय करत आहात ते तुम्हाला चांगलेच माहीत आहे. अर्थात माझ्यासाठी हा निर्णय घेणे कठीण होते. पण सगळ्या परिस्थितीचा विचार केला, तर हा निर्णय समंजसपणाचा होता. मी जास्त विचार करणार नाही, असे रोहित पुढे म्हणाला.
‘पुढे बॅट चालणारच नाही असे नव्हे’
रोहितच्या या पवित्र्यामुळे या मालिकेनंतर तो कसोटी कारकिर्दीची समाप्ती करू शकेल, अशी अटकळ बांधणे सुरू झाले आहे. ‘हा निवृत्तीचा निर्णय नाही. मी खेळ सोडणार नाही. पण बॅट चालत नसल्याने मी या सामन्यातून बाहेर पडलेलो आहे. पण दोन महिन्यांनंतर किंवा सहा महिन्यांनंतरही बॅट चालणारच नाही असे नाही’, असे तो म्हणाला. ‘आम्ही क्रिकेटमध्ये बरेच काही पाहिले आहे. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला, दररोज जीवन बदलते. त्यामुळे परिस्थिती बदलेल, असा माझा विश्वास आहे. त्याचबरोबर मी वास्तववादी देखील असले पाहिजे. एखादी व्यक्ती काय लिहिते, काय बोलते यामुळे आपले जीवन बदलत नाही. हा खेळ आम्ही इतकी वर्षे खेळत आहोत. म्हणून आपण केव्हा जायचे किंवा कधी खेळू नये, ते हे लोक ठरवू शकत नाहीत’, असे मत रोहितने व्यक्त केले.