लुथरांना रोहिणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला
पणजी : दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने गुऊवारी सौरभ आणि गौरव लुथरा बंधूंना हडफडे नाईट क्लबमधील भीषण आगप्रकरणी अंतरिम संरक्षण देण्यास नकार देताना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रोहिणी न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश वंदना यांनी त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले, कारण घटनेनंतर लगेचच हे बंधू थायलँडला पळून गेले होते, ज्यामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू झाला होता. लुथरा बंधूंना सध्या थायलँडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.
सुनावणीदरम्यान, गोवा पोलिसांचे वकील अभिनव मुखर्जी यांनी युक्तिवाद केला की, दोन्ही भावांनी व्यवसायातील आपला सहभाग कमी असल्याचे खोटे सांगितले आहे, आणि त्यांचा परदेश प्रवास पूर्वनियोजित होता. गोवा पोलिसांनी लुथरा बंधूंच्या दाव्यांना खोटे ठरवणारी अनेक कागदपत्रे सादर केली, ज्यात सौरभ लुथराने दाखल केलेला ‘एफएसएसएआय’चा अर्ज, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अर्ज आणि दोन्ही भाऊ व अजय गुप्ता भागीदार असल्याचे दर्शवणारे जीएसटी रेकॉर्ड यांचा समावेश होता.
गोवा पोलिसांनी न्यायालयाला पुढे सांगितले की, त्या आस्थापनेचा पंचायत परवाना कालबाह्य झाला होता आणि त्याचे नूतनीकरण केले गेले नव्हते, तसेच तो व्यवसाय वैध परवानगीशिवाय चालवला जात असल्याचा पुरावा म्हणून परवाना करारपत्रही सादर करण्यात आले. गोवा पोलिसांनी न्यायालयाला असेही सांगितले की, लुथरा बंधूच एका अऊंद बाहेर पडण्याच्या मार्गासह नाईट क्लब चालवण्यासाठी जबाबदार होते आणि त्यांनीच आगीच्या घटनेपूर्वी फायर शो आयोजित केला होता.
दुसरीकडे, लुथरा बंधूंचे वकील तन्वीर अहमद यांनी युक्तिवाद केला की, 6 डिसेंबर रोजी त्यांनी आपल्या ट्रॅव्हल एजंटला प्रवासाच्या योजनेची माहिती दिली असूनही, त्यांना फरार म्हणून दाखवले जात आहे. कुटुंबाच्या मालमत्तेची तोडफोड केली जात आहे आणि त्यांनी सरकारी यंत्रणांकडून वैयक्तिक सूडबुद्धीचा आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले. निकालाची पर्वा न करता ते भारतात परत येतील. लुथरा बंधू व्यावसायिक आहेत, ते 5,000 कोटी ऊपयांचा आर्थिक घोटाळा करून देशातून पळून गेलेले नाहीत.
लुथरा बंधूंची आई, पत्नीही कटात सामील
गोवा पोलिसांनी सांगितले की, आगीनंतर लुथरा बंधूंनी लगेचच पहाटे 1.15 वाजता विमानाचे तिकीट बूक केले आणि 7 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता ते थायलँडला रवाना झाले. ही कारवाई अटकेपासून वाचण्याचाच प्रयत्न होता. त्यांच्या आई आणि पत्नीने पोलिसांना सांगितले की, त्यांना ठिकाणाबद्दल माहिती नाही आणि त्यांच्याकडे त्यांचे फोन नंबर नाहीत. त्यानंतर अजामीनपात्र वॉरंट, लूक आऊट सर्क्युलर आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली, असेही गोवा पोलिसांनी न्यायालयात सांगितले.