रोहन बोपण्णा ‘भारता’साठी निवृत्त,
आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये यापुढेही खेळत राहणार
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचा दुहेरीतील अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णाने यापुढे भारतीय जर्सीत खेळताना दिसणार नसून हा भारतासाठी खेळलेला शेवटचा सामना होता, असे त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत पराभूत झाल्यानंतर सांगितले.
या स्पर्धेत बोपण्णा एन. श्रीराम बालाजीसमवेत दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करीत होता. त्यांना यजमान फ्रान्सच्या एदुआर्द रॉजेर व्हॅसेलिन व गेल मोनफिल्स यांच्याकडून पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. माजी टेनिसपटू लियांडर पेसने 1996 मध्ये अॅटलांटा ऑलिम्पिकमध्ये एकेरीत कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर भारताला आतापर्यंत टेनिसमधील पदकाने हुलकावणीच दिली आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये बोपण्णा व सानिया मिर्झा मिश्र दुहेरीचे पदक मिळविण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. पण अखेर त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
‘देशासाठी खेळलेला हा माझा शेवटचा सामना होता. माझ्या क्षमतेची मला जाणीव असून यापुढेही मी आंतरराष्ट्रीय टेनिस सर्किटमध्ये खेळत राहणार आहे,’ असे बोपण्णाने सांगितले. त्याच्या या घोषणेमुळे 2026 मध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तो उपलब्ध होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले. त्याने डेव्हिस कपमधूनही याआधीच निवृत्ती घेतली आहे. ‘2002 पासून मी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. सुमारे दोन दशके मला देशाचे प्रतिनिधित्व करता आले, हा माझ्यासाठी बोनसच आहे. पदार्पणानंतर 22 वर्षे मला देशासाठी खेळता आले, या मला सार्थ अभिमान वाटतो,’ अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.
2010 मध्ये ब्राझीलविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीत पाचव्या निर्णायक सामन्यात रिकार्दो मेलोवर मात करीत भारताला विजय मिळवून दिला. देशासाठी खेळताना मिळविलेले यश माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होता. याशिवाय बेंगळूरमध्ये सर्बियाविरुद्धच्या लढतीतील पाच सेट्सच्या दुहेरी सामन्यात मिळविलेला विजय हा क्षणही संस्मरणीय होता, असेही तो म्हणाला.