रोहन बोप्पन्नाचा टेनिसला निरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा अव्वल आणि ज्येष्ठ टेनिसपटू रोहन बोप्पन्नाने आपल्या तब्बल 20 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीला निरोप दिला आहे. शनिवारी रोहन बोप्पन्नाने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. 45 वर्षीय रोहन बोप्पन्नाने जवळपास 20 वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत भारताच्या चार टेनिसपटूंनी ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील अजिंक्यपदे मिळविली असून यामध्ये बोप्पन्नाचाही समावेश आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत रोहन बोप्पन्ना सध्या सहभागी झाला असून तो पुरूष दुहेरीत बुबलीकसमवेत खेळत असताना त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बोप्पन्नाने टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
रोहन बोप्पन्ना हा कर्नाटकातील कुर्गचा रहिवासी आहे. गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बोप्पन्नाने आपला सहभाग दर्शविला होता. 2023 साली बोप्पन्नाने डेव्हिस चषक स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली होती. बोप्पन्नाने आपली शेवटची डेव्हिस चषक लढत लखनौमध्ये मोरोक्को विरुद्ध खेळली होती. टेनिस क्षेत्रातून निवृत्त होण्याची ही योग्यवेळ असून अखिल भारतीय टेनिस फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच भारतीय टेनिसपटूंनी दिलेल्या सहकार्याबद्दल बोप्पन्नाने सर्वांचे आभार मानले आहेत.