रॉजर फेडररचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश
वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
स्वीसचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेनिसपटू तसेच आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे आपल्या 25 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीत मिळविणाऱ्या रॉजर फेडररचा येथे शनिवारी टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. स्वीसच्या 45 वर्षीय फेडररचा अमेरिकन टेनिस फेडरेशनतर्फे हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन गौरव करण्यात आला.
न्यू पोर्ट ऱ्होडे आयलंड येथे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये फेडररच्या तैलचित्राचा समावेश करण्यासाठी आयोजिलेल्या समारंभात माजी टेनिसपटू मेरी कॅरिलो तसेच अमेरिकन टेनिस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. अमेरिकन टेनिस स्पर्धा यावर्षी सुरु होण्यापूर्वी रॉजर फेडररसाठी एक प्रदर्शनीय सामना राफेल नदालबरोबर येथे आयोजिक केला होता. या सामन्यावेळी सुमारे 52 हजार टेनिस शौकिन उपस्थित होते. 2004 ते 2008 या कालावधीत रॉजर फेडररने सलग पाच वेळेला अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. त्याने आठ वेळेला विम्बल्डन ग्रँडस्लॅम, सहा वेळेला ऑस्ट्रेलियन आणि एकदा फ्रेंचे ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. 2005 ते 2007 या कालावधीत फेडररने सलग 10 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. रॉजर फेडरर आपल्या कुटुंबासह या समारंभाला उपस्थित होता. त्याने स्पर्धा आयोजकांचे तसेच हजारो टेनिस शौकिनांचे आभार मानले.