खडकाळ बेट ठरले पार्टी आयलँड
लोक घर खरेदी करतात आणि मग त्याचे नुतनीकरण करून नवे स्वरुप देत महाग दरात विकून टाकून पैसे कमावतात, परंतु कुणी एखाद्या बेटासोबत असे करू शकतो का? लोक पूर्ण बेट खरेदी करून त्याला सुविधांनी युक्त करत विकू शकतात का? हे अनोखे काम एक सॉफ्टवेअर इंजिनियर माइक कॉर्नरने पेले आहे. त्याने 6 कोटी 53 लाख रुपयांमध्ये थॉर्न बेट खरेदी केले आणि त्यावर 23 कोटी 52 लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करत 5 वर्षांनी आता हे बेट 35 कोटी 25 लाख रुपयांमध्ये विकण्यास तयार आहे.
5 वर्षांचा कालावधी
माइकने याकरता पैशांसोबत स्वत:च्या आयुष्यातील 5 वर्षे गुंतविले आणि एका नॅपोलियन बेट किल्ल्याला जेम्स बाँडच्या चित्रपटातील आकर्षक पार्टी आयलँडमध्ये बदलले आहे. त्याने एका युट्यूब क्लिपमध्ये या बेटाला पाहिले होते, त्यावेळी तेथे इमारतीच्या नावावर एक डिफेन्स स्ट्रक्चर होती, नंतर त्याला नवे स्वरुप देण्याची योजना त्याने आखली.
आकर्षक मालमत्ता
माइकने 2017 मध्ये केवळ 55,500 पाउंड म्हणजेच 6 कोटी 53 लाख रुपयांमध्ये हे बेट खरेदी केले आणि किल्ल्याला एका अनोख्या घरात बदलले. पूर्वीचा किल्ला पार्टी डेस्टिनेशन म्हणून उपयुक्त ठरू शकतो. किल्ल्यात जवळपास 800 लोक सामावू शकतात. माइक या ठिकाणाला लोकांसाठी 24 तासांचा अनुभव प्रदान करण्याची कल्पना साकार करू पाहत आहे. या कल्पनेला मूर्त रुप देणे सोपे नव्हते. परंतु आता हे पूर्ण युकेमध्ये करण्यात आलेल्या सर्वात जटिल आणि महत्त्वाकांक्षी नूतनीकरण प्रकल्पांपैकी एक आहे. नुतनीकरणासाठी पुरवठा आणि उपकरणे कशी पोहोचवावी ही सर्वात मोठी समस्या होती. मिस्टर कॉनर यांच्याकडे याकरता एक उपाय होता. केवळ 2 दिवसांमध्ये 350 हेलिकॉप्टर ट्रिप्स करण्यात आल्या, जेणेकरून सर्वकाही बेटावर हवाई मार्गाने पोहोचविता येईल.
काय काय पहाल किल्ल्यात ?
किल्लाच्या आत मोठे कक्ष, लाकूड जाळणारे स्टोव, मेजनाइन बेडरुम्ससोबत सर्पिल जिने आणि लक्झरी नव्या बाथरुम सुविधा दिसून येतील. किल्ला एक आधुनिक आणि आरामदायी स्थान ठरले आहे. मालमत्तेत मोठे किचन डायनर आणि फॅमिली एरिया, एक लाउंज आणि डायनिंग रुमसोबत अनेक शॉवर रुम आणि क्लोक रुम्स सामील आहेत. किल्ल्यात पाहुण्यांसाठी पुरेशी जागा असून ज्यात सध्या 5 बेडरुम्स उपलब्ध आहेत.
येथे पोहोचणे सोपे नाही, कुठलेही सार्वजनिक साधन नाही, लोक जेम्स बॉन्ड शैलीत किंवा हेलिकॉप्टर किंवा नौकेतून प्रवेश करू शकतात. ही मालमत्ता 35 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.