आंबोली घाटात रस्त्यावर कोसळले दगड
आंबोली त. भा. वार्ताहर
आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या ठिकाणी एक भला मोठा दगड रस्त्यावरून थेट खाली दरीत कोसळला. तर दुसऱ्या एका मोठ्या दगडाचे तुकडे रस्त्यावर राहिल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. पावसाळी पर्यटन हंगाम सुरु होण्या अगोदरच अशी घटना घडल्याने पर्यटकांत तसेच वाहन चालकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भला मोठा दगड मुख्य रस्त्यावरून खाली घरंगळत गेल्याने संरक्षक कठडा , रॅलींग तुटून वाहनांस धोका निर्माण झाला आहे. आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी पन्नास मीटर अंतरावर दोन भलेमोठे दगड अचानक खाली आले. एक मोठा दगड सरळ रस्त्यावरून खाली गेला तर दुसरा तुकडे होऊन रस्त्यावर राहिला. सुदैवाने या वेळेस रस्त्यावरून जाणारे एकही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.आंबोलीत आता पावसाळी हंगाम सुरू होणार आहे. त्या अगोदरच असा प्रकार घडल्याने येणाऱ्या पर्यटकांत, वाहन चालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही असे बरेचशे मोठे दगड घाटमाथ्यावरील बाजुस असून ते कधीही खाली रस्त्यावर येऊ शकतात. तरी असे खाली येणारे दगड पाहून वनविभागाने ते बाजुला करावे जेणे करून भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
फोटो
विजय राऊत