तामिळनाडूत मंदिरानजीक मिळाले रॉकेट लाँचर
पोलीस, सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यात कावेरी नदीच्या काठावर रॉकेट लाँचर मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तेथील अंडानल्लूर मंदिरानजीक नदीकाठावर भाविकांना एक असामान्य वस्तू दिसून आल्यावर याची कल्पना त्वरित पोलिसांना देण्यात आली. संबंधित स्थळावर पोहोचताच पोलिसांनी तपास सुरू केला. याचबरोबर बॉम्बपथकालाही पाचारण करण्यात आले. अधिक तपास करण्यात आला असता संबंधित वस्तू ही रॉकेट लाँचर असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी रॉकेट लाँचर ताब्यात घेत तो भारतीय सैन्याकडे सोपविला आहे. याप्रकरणी विस्तृत तपास केला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रॉकेट लाँचर कुठून आला हा आमच्या तपासाचा मुख्य विषय आहे. सुरक्षा यंत्रणा याप्रकरणी माहिती जमवत आहेत. याचबरोबर आसपासच्या भागांमध्ये देखरेख वाढविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
एलटीटीई तामिळनाडूत पुन्हा स्वत:ला पुनरुज्जीवत करू पाहत असल्याचा इशारा केंद्रीय यंत्रणांनी राज्य सरकारला अनेकदा दिला आहे. याचबरोबर श्रीलंकेतून सागरी मार्गे अनेक असामाजिक घटक येत असून अमली पदार्थ तसेच शस्त्रास्त्रांच्या तस्करीत हे घटक सामील आहेत. सागरी मार्गे तस्करीद्वारे येणारी शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा हा केरळमध्ये पोहोचविला जातो आणि तो नक्षलवाद्यांकडे सोपविला जात असल्याचे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी राज्य पोलिसांना कळविले आहे. याचबरोबर आयएसआय देखील कोलंबोतून सागरी मार्गे तामिळनाडूत स्वत:चे मॉड्यूल निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.