Panhala Fort : पहिल्याच पावसात पडझड, पन्हाळा मुख्य रस्त्यावर पुन्हा शिळा कोसळली
जकात नाक्याच्या इमारतीला देखील धोका निर्माण झाला आहे.
पन्हाळा : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या जोरदार पावसात पन्हाळ्याच्या मुख्य रस्त्यावर भली मोठी दगडी शिळा कोसळली होती. यामुळे मुख्य रस्त्यावर दरडीचा धोका गडद झाला होता. त्यात शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शिळा कोसळल्याने हा मार्ग धोकादायक ठरला. तसेच जकात नाक्याच्या खालील बाजुची साधोबा तलावाच्या भिंतीचा भराव सरकल्याने जकात नाक्याच्या इमारतीला देखील धोका निर्माण झाला आहे.
मान्सुनपूर्व पावसाने पन्हाळ्यासह परिसरात आपला धुमधडाका लावला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती मिळत आहे, पण पडझड देखील पहिल्याच पावसात सुरु झाली आहे. पन्हाळ्यातील मुख्य रस्त्यावर दगडी शिळातून दगड सुटुन रस्त्यावर आला. यावेळी या गर्दीच्या रस्त्यावर असणारी वाहनांची गर्दी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. पण आता भविष्यात ती होणार नाही म्हणून दुर्लक्ष करुन चालणार नाही.
दरम्यान, हा दगड तातडीने हटवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. तसेच सध्या साधोबा तलावचे काम चालु आहे. त्यात या तलावाच्या वर असलेला जकात नाक्याची इमारत मागील वर्षीच्या तलावाच्या भितींच्या पडझडीमुळे धोकादायक झाली आहे. पण आता पुन्हा शनिवारी सकाळी या इमारतीच्या खालील बाजुच्या तलावाच्या भिंतीचा भाग सुटला आहे. त्यामुळे या इमारतीला तडे गेले आहेत. ही इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील चार महिने या इमारतीत कसे काढायचे याचा प्रश्न येथील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.