आर्थिक वर्षात ४७ लाख वाहनांची दमदार विक्री
विविध कंपन्यांची मार्चची आकडेवारी जाहीर, जीएसटी सवलतीने विक्रीत वाढ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मार्चमधील वाहन विक्रीची आकडेवारी समोर आली असून विक्रीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. मागच्या आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांची विक्री 47 लाखांवर पोहोचली. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सेडान व युटिलिटी वाहन प्रकारांमध्ये मागच्या महिन्यात 16 टक्के इतकी विक्रीत वाढ झाली आहे. जीएसटी दरामध्ये कपात केलेल्याचा फायदा वाहन कंपन्यांना उठवता आला आहे.
प्रवासी वाहनांची एकंदर विक्री आर्थिक वर्षामध्ये 8.3 टक्के वाढत 47 लाखांवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पाहता ही विक्री 43 लाख 40 हजार इतकी होती. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी मागणी, पुरवठा आणि उत्पादनामध्ये कोणतेही अडथळे जाणवलेले नाहीत. वाहनांची मागणी शाश्वत स्वरूपात राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आर्थिक वर्ष 2027 मध्ये कार विक्रीत पाच टक्क्यांची वाढ दिसू शकते असेही म्हटले जात आहे.
मारुतीच नंबर वन
मारुती सुझुकी या कार विक्रीतील आघाडीवरच्या कंपनीने 18 लाख वाहनांची विक्री आर्थिक वर्ष 2026 मध्ये केली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये हीच विक्री 17 लाखांवर होती. आर्थिक वर्षाचे पहिले 6 महिने कंपनीसाठी आव्हानात्मक राहिले होते. दुसऱ्या सहामाहीत जीएसटी सवलत लागू झाल्याने वाहन विक्रीत वाढ झालेली पहायला मिळाली. कंपनीकडे सध्याला 1 लाख 90 हजार वाहनांची ऑर्डर आहे.
अन्य कंपन्यांची कामगिरी
अन्य इतर देशातल्या ऑटो कंपन्यांच्या कामगिरीकडे पाहता, मार्च 2026 मध्ये टाटा मोटर्सने 66,192 वाहनांची विक्री केली आहे. या मागच्या 2025 मार्चमध्ये कंपनीने 51,616 गाड्यांची विक्री केली होती. या पाठोपाठ महिंद्रा आणि महिंद्रा तसेच ह्यांडाई मोटर इंडिया यांचा नंबर असून त्यांनी अनुक्रमे मार्च 2026 मध्ये 60772, 55064 वाहनांची विक्री केली होती. महिंद्रा आणि महिंद्रा यांनी मार्च 2025 च्या तुलनेमध्ये वाहन विक्रीत यंदाच्या मार्चमध्ये 25 टक्के वाढ नोंदवली आहे. तर ह्युंडाईने वाहन विक्रीत नाममात्र 6 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.