सीमेवरील सुरक्षेसाठी रोबोटिक श्वान तैनात
डोंगर-दऱ्यांपासून पाण्यातही काम करण्यास सक्षम : 10 किमी अंतरावरून ऑपरेट करण्याची सुविधा
वृत्तसंस्था/जैसलमेर
आता देशाच्या सीमेवर सैनिकांसोबत रोबोटिक मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट (एमयुएलई) म्हणजेच रोबोटिक श्वानही तैनात केले जातील. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जैसलमेरमधील पोखरण फायरिंग रेंज येथे रोबोटिक श्वानांनी भारतीय लष्कराच्या बॅटल एक्स डिव्हिजनसोबत सराव केला. शत्रूला शोधून त्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराने या श्वानांसोबत सराव केला आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात (विशेषत: उच्च उंचीच्या भागात) वापरासाठी 100 रोबोटिक श्वान समाविष्ट केले आहेत. भारतीय लष्कराच्या बॅटल एक्स डिव्हिजनच्या युनिटमधील 50 हून अधिक जवानांनी अलिकडेच येथे लष्करी सराव पूर्ण केला. या सरावात सुमारे 10 रोबोटिक श्वानांचा समावेश करण्यात आला होता.
यादरम्यान शत्रूचा शोध घेणे, शस्त्रे बाळगणे, पॅमेऱ्यांद्वारे शत्रूचे ठिकाण उघड करणे यासह कठीण परिस्थितीत सैनिकांना मदत करण्यासाठी रोबोटिक श्वानांची चाचणी घेण्यात आली. हे रोबोटिक श्वान कोणत्याही उंच डोंगरापासून ते खोल पाण्यातही काम करण्यास सक्षम आहेत. तसेच त्यांना 10 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरूनही ऑपरेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एक तास चार्ज केल्यानंतर ते 10 तास सतत काम करू शकतात. लष्कराच्या सरावादरम्यान उंचावरील भागात मदत आणि वाहतूक सुधारण्यासाठी लॉजिस्टिक ड्रोनची चाचणी केली जात आहे. रोबोटिक श्वान थर्मल पॅमेरे आणि रडारने सुसज्ज आहेत. तसेच ते सैनिकांना कोणत्याही हानीपासून वाचवताना शत्रूच्या लक्ष्यांवर गोळीबार करण्यास सक्षम आहेत.