रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी
हरियाणातील जमीन घोटाळा प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणातील जमीन घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीने मंगळवारी चौकशी केली आहे. तर वड्रा यांनी ईडीच्या समन्सला राजकीय सूडाची कारवाई ठरविले आहे. चौकशीदरम्यान यापूर्वीही ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक तास घालविले असून हजारो कागदपत्रे सादर केली आहेत, तरीही तपास यंत्रणा माझ्याविरोधात कारवाई करत आहे. परंतु मी कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही तसेच कुणालाच घाबरणार नसल्याचा दावा वड्रा यांनी केला आहे.
56 वर्षीय वड्रा हे मध्य दिल्लीतील स्वत:च्या निवासस्थानावरून एपीजे अब्दुल कलाम रोड येथील ईडी मुख्यालयापर्यंत चालत गेले. ईडीचा समन्स म्हणजे केवळ राजकीय सूड आहे. जेव्हा मी अल्पसंख्याकांसाठी बोलतो, तेव्हा ते मला रोखण्याचा प्रयत्न करतात. सत्तारुढांनी संसदेत राहुल गांधींनाही रोखण्याचा प्रयत्न केला, तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग आहे. तर ईडीसोबत मी पूर्वीप्रमाणेच सहकार्य करणार असल्याचे उद्गार वड्रा यांनी काढले आहेत.
यापूर्वी ईडीने वड्रा यांना जमीन व्यवहार प्रकरणी दुसऱ्यांदा चौकशीसाटी हजर राहण्यास सांगितले होते. समन्सनुसार ते मंगळवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीने यापूर्वी त्यांना 8 एप्रिल रोजी हजर राहण्याची सूचना केली होती. परंतु वड्रा तेव्हा उपस्थित राहिले नव्हते. तपास यंत्रणेने पीएमएलए अंतर्गत वड्रा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यापूर्वी ईडीने अन्य एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वड्रा यांची चौकशी केली होती.
ईडी वड्रा यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततांची चौकशी करत आहे. ईडीनुसार रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीने फेब्रुवारी 2008 मध्ये गुडगाव येथील शिकोहपूरमध्ये 3.5 एकरचा भूखंड 7.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. त्यांच्या कंपनीने यानंतर हा भूखंड रियल इस्टेट दिग्गज डीएलएफला 58 कोटी रुपयांमध्ये विकला होता.