For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात रॉबर्ट वड्रा?

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात रॉबर्ट वड्रा
Advertisement

गांधी घराण्याचा जावई इच्छुक : स्मृती इराणींना आव्हान देण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या रणांगणात स्वत:चे मोहरे उतरविले आहेत. तर उत्तरप्रदेशच्या व्हीआयपी मतदारसंघांपैकी एक अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाहीत. हे दोन्ही मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचे बालेकिल्ले होते, परंतु मागील लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना अमेठीत पराभूत केले होते. तर रायबरेली मतदारसंघाच्या खासदार राहिलेल्या सोनिया गांधी आता राज्यसभेवर गेल्या आहेत.  अशा स्थितीत सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा हे अमेठीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समोर आले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वड्रा यांनी अमेठीचे लोकच मी तेथून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी करत असल्याचा दावा गुरुवारी केला आहे. अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मी करावे अशी तेथील लोकांची इच्छा आहे. कित्येक वर्षांपर्यंत गांधी कुटुंबाने रायबरेली, अमेठीत कठोर मेहनत केली आहे. अमेठीचे लोक वर्तमान खासदारामुळे (स्मृती इराणी) त्रस्त आहेत. इराणी यांना निवडून चूक केल्याचे मतदारांना वाटत असल्याचा दावा वड्रा यांनी केला आहे.

Advertisement

अमेठीवासीयांना उमगली चूक!

अमेठीच्या लोकांना स्वत:ची चूक उमगली आहे. गांधी कुटुंबाच्या एखाद्या सदस्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे अशी आता लोकांचीच इच्छा आहे. मी जर राजकारणात सामील झालो तर मी अमेठीची निवड करणार आहे. माझे पहिले राजकीय अभियान प्रियांका यांच्यासोबत 1999 मध्ये अमेठी येथेच पार पडली होती असे रॉबर्ट वड्रा यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघ अत्यंत चर्चेत राहिला होता. तेव्हा स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत केले होते. राहुल गांधी यांनी 2004, 2009 आणि 2014 मध्ये अमेठी येथून विजय मिळविला होता. काँग्रेसने अद्याप अमेठी आणि रायबरेलीचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तर राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड येथून स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Advertisement

.