कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट नवीन पोप

06:45 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोप बनणारे अमेरिकेतील पहिले कार्डिनल : ‘पोप लिओ-14’ म्हणून ओळखले जाणार

Advertisement

वृत्तसंस्था/ व्हॅटिकन सिटी

Advertisement

व्हॅटिकनमध्ये झालेल्या पोप कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नवीन पोपची निवड करण्यात आली. 69 वर्षीय रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची नवीन पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्यांनी स्वत:साठी ‘पोप लिओ-14’ हे नाव निवडले आहे. 133 कार्डिनल्सच्या दोन तृतीयांश बहुमताने (89 मते) त्यांची पोप म्हणून निवड झाली. 1900 नंतर दोन दिवसांत नवीन पोपची निवड होण्याची ही पाचवी वेळ आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रोमन कॅथोलिक चर्चच्या सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढरा धूर निघाल्यानंतर नवीन पोपची निवड झाल्याचे दर्शविले जाते.

नवीन पोपची निवड होताच व्हॅटिकनमध्ये उपस्थित असलेल्या 45 हजारांहून अधिक लोकांनी टाळ्या वाजवून एकमेकांचे अभिनंदन केले. यापूर्वी, 7 मे रोजी झालेल्या मतदानाच्या पहिल्या दिवशी कोणालाही पोप म्हणून निवडण्यात आले नव्हते. सिस्टिन चॅपलपर्यंत औपचारिक मिरवणूक निघाल्यानंतर आणि प्रत्येक कार्डिनलने गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर बुधवारी रात्री 9:15 वाजता मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल रोजी निधन झाल्यानंतर रोमन कॅथोलिक चर्चच्या 267 व्या पोपची निवड करण्यात आली आहे. 7 मे रोजी मतदान सुरू होण्याच्या सुमारे 90 मिनिटे आधी सर्व सिग्नल बंद करण्यात आले होते. याप्रसंगी कॉन्क्लेव्ह परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे कॉन्क्लेव्ह ही एक गुप्त आणि पवित्र प्रक्रिया असून ती 13 व्या शतकापासून सुरू आहे. व्हॅटिकनच्या संविधानानुसार, पोपच्या मृत्यूनंतर 15 ते 20 दिवसांच्या आत कॉन्क्लेव्ह सुरू होणे आवश्यक आहे.

प्रत्येकाच्या हृदयात शांती असो : पोप

पोप म्हणून निवड झाल्यानंतर पोप लिआ-14 यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून स्पॅनिश भाषेत लोकांना संबोधित केले. त्यांनी लोकांना इतरांवर दया दाखवण्याचे आणि प्रेमाने जगण्याचे आवाहन केले. पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी म्हणून मला निवडणाऱ्या सर्व कार्डिनल्सचे मी आभार मानू इच्छितो. निर्भयपणे येशूचा प्रचार करणारे आणि त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या सर्वांसोबत काम करण्याचा मी प्रयत्न करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोप फ्रान्सिस यांच्या जवळचे

पोप लिओ यांचा जन्म 14 सप्टेंबर 1955 रोजी अमेरिकेतील इलिनॉय येथे झाला. त्यांना पोप फ्रान्सिस यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. त्यांची विचारसरणीदेखील पोप फ्रान्सिस यांच्याशी जुळणारी होती. घटस्फोटित आणि पुनर्विवाहित महिलांना सण साजरा करण्याची परवानगी देण्याच्या पोप फ्रान्सिस यांच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते.

नाव निवडण्याची परंपरा

जेव्हा कार्डिनल पोप म्हणून निवडला जातो तेव्हा त्यांना आपल्याला कोणते नाव द्यायचे अशी विचारणा करण्याची परंपरा सहाव्या शतकापासून सुरू आहे. पोपला त्याला हवे ते नाव निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु सहसा ते मागील पोप किंवा संतांची नावे निवडतात.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

दोन दिवसांच्या निवड प्रक्रियेनंतर प्रीव्होस्ट यांची पोप लिओ चौदावे म्हणून निवड झाली. नवीन पोप म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर  भारतातील जनतेच्या वतीने मी परमपूज्य पोप लिओ चौदावा यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. शांती, सौहार्द, एकता आणि सेवेच्या आदर्शांना पुढे नेण्याच्या एका महत्त्वाच्या क्षणी कॅथोलिक चर्चचे त्यांचे नेतृत्व आले आहे. आपल्या सामायिक मूल्यांना पुढे नेण्यासाठी भारत सतत संवाद आणि सहभागासाठी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article