For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Robbery on Yesvantpur-Bikaner Express यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर पहाटे ३ वाजता दरोडा, महिलांसह प्रवाशांना मारहाण

08:06 PM Jul 11, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
robbery on yesvantpur bikaner express यशवंतपूर बिकानेर एक्स्प्रेसवर पहाटे ३ वाजता दरोडा  महिलांसह प्रवाशांना मारहाण
Advertisement

विजय थोरात, सोलापूर
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी घुसून महिलांसह प्रवाशांना मारहाण मारहाण केली. प्रवशांकडील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले.
दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गाडी क्रमांक 16587 यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस शनिवारी पहाटे 2.49 ते 4.03 या कालावधीत तब्बल 74 मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती. याच संधीचा फायदा घेत पाच ते सहा जणांच्या टोळीने एस-4, एस-6 आणि एस-7 या डब्यांमध्ये प्रवेश केला. काही आरोपींनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांचे साहित्य हिसकावले. तर काहींनी थेट डब्यात प्रवेश करून महिलांच्या गळ्यातील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.

Advertisement

- सोलापूर लोहमार्ग पोलिसांचे पथक यांच्याबरोबर तडवळ स्थानकावर दाखल झालेली फॉरेन्सिक टीम.

या घटनेत एस-7 डब्यामधून प्रवास करणारे सोलापूरचे महेश गोपाळ पवार (वय 34, रा. पूर्व मंगळवार पेठ) यांच्या पत्नीच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सुमारे 1 लाख 43 हजार 500 रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली. याशिवाय इतर तीन प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि अन्य साहित्यही चोरट्यांनी लुटले.
दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या प्रवाशांना मारहाण केली. काही प्रवाशांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कोच एस-6 मधील सीट क्रमांक 53 वर प्रवास करणारे कालूराम भाटी (रा. पाली, राजस्थान) यांच्या नाकाजवळ गंभीर दुखापत झाली.

त्यांच्या चेहर्यावरून रक्तस्त्राव सुरू होता. आरपीएफने त्यांच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार केले. रेल्वे मदत क्रमांकावर तक्रार आल्यानंतर गाडी पहाटे 4.58 वाजता सोलापूर स्थानकात पोहोचताच आरपीएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटना घडल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली. महेश गोपाळ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement

जखमी प्रवाशाला सोलापूर स्थानकावर आल्यानंतर उपचार करताना डॉक्टर.

जखमी प्रवाशांवर सोलापुरात उपचार
तडवळ स्थानकावर प्रवासी आणि दरोडेखोर यांच्या झालेल्या झटापटीत अनेक प्रवासी जखमी झाले. दगडफेकीमुळे काहींच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर दुखापती झाल्या. गाडी सोलापूर स्थानकात दाखल होताच आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे वैद्यकीय पथकाने जखमींना तातडीने खाली उतरवून प्राथमिक उपचार केले. फलाटावर जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.

पूर्वनियोजित दरोड्याची शक्यता
मुंबई विभागातील ठाकूरवाडी-मंकीहिल दरम्यान दरड कोसळल्यामुळे गेल्या आठवड्यापासून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस वेळेआधी या विभागात पोहोचत असल्याने तिला तडवळसह काही स्थानकांवर दीर्घकाळ थांबविले जात आहे. या परिस्थितीचा अभ्यास करून दरोडेखोरांनी नियोजनबद्धरीत्या हा दरोडा टाकल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती. चार ते सहा जण या टोळीत सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

रेल मदतवर तक्रार, आरपीएफला माहितीच नव्हती?
घटना घडल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा करून मदतीसाठी धावाधाव केली. मात्र, कर्तव्यावरील आरपीएफ जवानांना या प्रकाराची माहितीच नसल्याचे समोर आले. अखेर प्रवाशांनी रेल मदतवर तक्रार नोंदवल्यानंतर सोलापूर येथील आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सतर्क झाले. त्यानंतरच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. त्यामुळे रेल्वेच्या आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जखमींवरील उपचारासाठी सर्व यंत्रणेची धावपळ
घटनेची माहिती आधीच मिळाल्याने सोलापूर स्थानकावरील स्टेशन मास्तर, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासनीस आणि रेल्वे वैद्यकीय कर्मचारी फलाटावर सज्ज होते. गाडी येताच जखमी प्रवाशांना खाली उतरवून रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले.

हेही वाचा : Meerut Shocking News सोनाराने दिले पाणी, निघाले ॲसीड..युवतीची जीवघेणी तडफड

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून रेल्वे परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहा वर्षांनंतर पुन्हा तडवळ हादरले
29 मे 2016 रोजी तडवळ स्थानकावर थांबलेल्या हुबळी-सिकंदराबाद एक्स्प्रेसवरही अशाच प्रकारचा दरोडा पडला होता. त्यानंतर रेल्वे सुरक्षा वाढविण्यासाठी सीसीटीव्ही, रात्रगस्त आणि बंदूकधारी जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, दहा वर्षांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी दरोडा पडल्याने रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटना घडत असताना आरपीएफ जवान नेमके कुठे होते, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

गार्डलाही नव्हती माहिती
आरपीएफने गाडीचे ऑन-ड्युटी गार्ड धीरज कुमार यांची चौकशी केली असता, गाडी 2.49 ते 4.03 या कालावधीत 74 मिनिटे तडवळ स्थानकावर उभी होती, मात्र या घटनांची त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्ह्याची पद्धत आणि तपशील

🚆 गाडी क्रमांक16587 यशवंतपूर–बिकानेर एक्स्प्रेस
📅 घटनेची वेळशनिवार, पहाटे 2:49 ते 4:03
📍 घटनास्थळतडवळ रेल्वे स्थानक
⏱️ गाडी थांबण्याचा कालावधी74 मिनिटे स्थानकावर उभी; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
👥 संशयित आरोपी4 ते 6 जणांच्या टोळीचा संशय
💍 लुटीचा प्रकारमहिलेची 5 तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावली
📱 चोरीचा ऐवजमोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास
🪨 हल्ल्याची पद्धतविरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक व मारहाण
🏥 जखमी प्रवासीअनेक प्रवासी जखमी; सोलापुरात उपचार सुरू
🚔 पोलीस कारवाईअज्ञात आरोपींविरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल
🔍 तपासाची स्थितीफॉरेन्सिक तपास सुरू; आरोपींचा शोध सुरू

Advertisement
Tags :

.