गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग शुल्काद्वारे लूट
बेळगाव, चंदगड येथील वाहनचालकांना फटका : भाड्यापेक्षा पार्किंग शुल्कच अधिक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यालगत गोवा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु, मोपा विमानतळावरील पार्किंग शुल्कामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. विमानतळाच्या पार्किंगमध्ये केवळ 35 मिनिटांसाठी थांबलेल्या मॅक्सिकॅबला (वडाप) 2 हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आले आहे. भाड्यापेक्षा पार्किंग शुल्कच अधिक असल्याने व्यवसाय करायचा कसा? असा प्रश्न वाहनचालकांसमोर आहे.
गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेळगाव व चंदगड येथील काही प्रवासी येणार होते. त्यांना आणण्यासाठी बेळगावमधील एक मॅक्सिकॅब मंगळवारी विमानतळावर गेली. विमान काहीसे विलंबाने आल्याने मॅक्सिकॅब विमानतळातील पार्किंगमध्ये थांबविण्यात आली. परंतु, केवळ 35 मिनिटांसाठी 2 हजार रुपयांचे पार्किंग शुल्क वाहनचालकाला देण्यात आले. त्यामुळे वाहनचालकाने पार्किंग कंपनीच्या कामगारांना जाब विचारला असता आपल्या नियमाप्रमाणे आपण पार्किंग शुल्क घेतल्याचे सांगून हात झटकण्यात आले.
बेळगाव शहरापासून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्यामुळे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. गोवा येथून देशांतर्गत तसेच देशाबाहेरील विमानांची वाहतूक होत असल्यामुळे बेळगाव, चंदगड, कोल्हापूर, सांगली, हुबळी या भागातील प्रवासी विमानतळावर येत असतात. परंतु, पार्किंग शुल्कामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. चार ते पाच हजार रुपये भाडे घेऊन काही वाहने बेळगाव, चंदगडमधून गोवा विमानतळावर गेल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात पार्किंग शुल्क लादले जात असल्याने गोवा सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अर्ध्या तासासाठी 1800 ते 2 हजार रु. शुल्क
बेळगाव, कोल्हापूर या भागातून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मॅक्सिकॅबला भाडी मिळतात. परंतु, विमानतळावरील पार्किंग शुल्काद्वारे वाहनचालकांची लूट केली जात आहे. अर्ध्या तासासाठी 1800 ते 2 हजार रुपये शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे भाडे किती घेणार व पार्किंग शुल्क किती भरणार? असा प्रश्न वाहनचालकांसमोर आहे.
- महेश पाटील (अध्यक्ष मॅक्सिकॅब असोसिएशन बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज)