For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावात दरोडा...मथुरेतही राडा!

11:13 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावात दरोडा   मथुरेतही राडा
Advertisement

राष्ट्रीय महामार्गावर दहा लाखांची लूट : मथुरा पोलिसांकडून गोळीबार करून चैघांना अटक

Advertisement

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरजवळ एक महिन्यापूर्वी कार अडवून दरोडा टाकणाऱ्या दरोडखोरांच्या टोळीला मथुरा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील गुन्हेगारांवर गोळीबार करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बेळगाव जिल्हा पोलिसांचे एक पथक मथुरा येथे तळ ठोकून आहे. दि. 30 जून रोजी सकाळी 6.30 ते 7 या वेळेत बेळगावहून शिमोग्याला जाणारी केए 17 एमए 1992 क्रमांकाची नेक्सॉन कार अडवून 10 लाख रुपयांचा दरोडा घालण्यात आला होता. कारमध्ये असलेल्या सुनील प्रजापत व श्रीचंद नाथसिद्ध यांना मारहाण करण्यात आली होती. इनोव्हामधून पाठलाग करून सहा जणांच्या एका टोळीने हे कृत्य केले होते. दि. 3 जुलै रोजी कित्तूर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. गुन्हेगारांसाठी सर्वत्र शोध सुरू असतानाच या प्रकरणातील गुन्हेगार मथुरामध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

या चौघा जणांनी कित्तूरजवळ दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कित्तूर पोलिसांना या चौकडीला ताब्यात घ्यावे लागणार आहे. बेळगावहून पाठलाग करून कारमधील दोघा जणांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून त्यांना लुटण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार मथुरामध्ये गुन्हे करण्यासाठी जाताना ही चौकडी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी कार अडवताच पोलिसांवर गोळीबार करून पलायन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हिरालाल व रवी हे दोघेजण जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती मिळणार आहे. मथुरा येथील जैंत पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्यांना अटक झाली आहे. देवी आटस, रामताल रोडवर गोळीबाराची घटना घडली असून हिरालाल, रवी ऊर्फ रवींद्र, लक्ष्मण नाथ व राहुल या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण राजस्थानमधील बिकानेरमधील आहेत.

Advertisement

10 लाख रुपये, गावठी पिस्तूल, 16 काडतुसे जप्त 

दरोडेखोरांची टोळी मथुरा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी कित्तूर पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून एक-दोन दिवसात मथुरा येथे आणखी एक पथक रवाना होणार आहे. हिरालाल, लक्ष्मण, रवी आदींना अटक झाली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून 10 लाख रुपये, गावठी पिस्तूल व 16 काडतुसे जप्त केली आहेत.

Advertisement
Tags :

.