Kolhapur News : व्यापाऱ्याच्या 50 लाखांच्या हवाला रकमेवर चौघांचा डल्ला, CCTV फुटेज आले समोर
दुचाकीवरुन आलेल्या चौघा जणांनी टेम्पोमधून ही रक्कम लुटली
कोल्हापूर, उचगाव : गांधीनगर (ता. करवीर) येथील गणेश टॉकीज परिसरातील एका व्यापाऱ्याच्या 50 लाख रुपयांच्या हवाला रकमेवर चौघांनी डल्ला मारला. शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या चौघा जणांनी टेम्पोमधून ही रक्कम लुटली.
यामुळे गांधीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित व्यापाऱ्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांशी संपर्क साधून चोरीची घटना सांगितली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, गांधीनगर रोडवर गणेश टॉकीजच्या मागे एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याने शुक्रवारी रात्री सुमारे 50 लाख रुपयांची रोकड आपल्या कर्मचाऱ्यांकरवी टेम्पोत ठेवली. दुसऱ्या दिवशी ही रक्कम कोणाकडे तरी पुढे पाठवायची होती.
टेम्पोची काच फोडून अज्ञात चोरट्याने शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही रोकड लंपास केली. यानंतर या व्यापाऱ्याला रोकड चोरी झाल्याचे समजले. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधला. गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी मी पोलीस ठाण्यात असून अद्याप कोणीही या चोरीची फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दिलेली नाही.
जोपर्यंत फिर्याद दाखल होत नाही तोपर्यंत या घटनेची माहिती सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, चोरीची नोंद अद्याप झाली नसली तरी शनिवारी दिवसभर गांधीनगर परिसरात या चोरीचीच दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. गांधीनगर पोलिसांनीही याबाबत त्या व्यापाऱ्याशी संपर्क साधून माहिती घेतली.
चौघांजणांचे कृत्य
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्हीमध्ये चार चोरटे चोरी करताना दिसत आहेत. दोन दुचाकीवरुन हे चार
चोरटे २ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास गणेश टॉकीजच्या पिछाडीस आले आहेत. मात्र अंधारामुळे स्पष्ट फुटेज पोलिसांना मिळाले नसल्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
टेम्पोत पैसे ठेवण्यासाठी कप्पे
हवालाच्या रकमेचे कोणतेही ऑन रेकॉ ईर्ड नसते. यामुळे ही रक्कम छुप्या पद्धतीने नेण्यात येते. ही रक्कम नेण्यासाठी त्या टेम्पोमध्ये छुप्या पद्धतीने कप्पे करण्यात आले होते. याच कप्प्यातून ही रक्कम चोरीस गेली आहे.
पाळत ठेवून चोरी
चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली आहे. शनिवारी पहाटे हवालाची रक्कम गांधीनगर येथून जाणार असल्याची टिप चोरट्यांना मिळाली होती. यानुसार चौघा जणांनी ही चोरी केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणची 4 पथके मागावर
लुटीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तत्काळ या घटनेचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले. यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या तपासासाठी 4 पथके तैनात केली. 1 पथक सीसीटीव्ही फुटेज तपासणे, 1 पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध, आणी 2 पथके तांत्रिक तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत.
120 दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तातडीने या घटनेचा तपास सुरू केला. सुमारे 120 हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या मध्ये हॉटेल, बार, दुकानांचा समावेश आहे. रोकड 50 लाखांहून अधिक असण्याची शक्यता असल्याने या चोरीचे गांभीर्य वाढले आहे.