पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा
चडचण तालुक्यातील सराफ दुकान लुटले : 20 तोळे सोने, एक किलो चांदी लांबविली
वार्ताहर/विजापूर
चित्रपटाच्या धर्तीवर हेल्मेट घालून युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या दोन बुरखाधारी चोरट्यांनी पिस्तूल दाखवून ज्वेलर्सवर दरोडा टाकला. दुकानातील सोने व चांदीचे दागिने लुटून ते फरार झाले. चडचण तालुक्यातील हलसंगी गावात सोमवारी भर दुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ माजली. सोमवारी दुपारी सुमारे 3 वा. हलसंगी गावातील महादेव कांचागार यांच्या मालकीच्या सोन्याच्या दुकानावर दोन बुरखाधारी चोरटे दुचाकीवरून येऊन दुकानातील सोने व चांदीचे दागिने लुटून फरार झाले. आधीच नियोजन केल्याप्रमाणे, हेल्मेट, जॅकेट व हातमोजे घालून आलेल्या चोरट्यांनी पिस्तूल धाक दाखवून दुकानातील सुमारे 205 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 किलो चांदी लुटली. ही घटना जवळील सीसीटीव्ही पॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दरोड्याच्या वेळी दुकानाजवळ वृद्ध महिला आली होती. तात्काळ बुरखाधारी चोरट्यांनी तिच्यावर पिस्तूल रोखून तिला घाबरवून पाठवले. इतकेच नव्हे तर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हवेत दोन राऊंड गोळीबार केला. यावेळी आत्मलिंग हुगार नावाच्या तरुणाच्या उजव्या पायाला गोळी लागली असून त्याला तात्काळ विजापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा हट्टी, डीवायएसपी कट्टीमणी आणि निरीक्षक परशुराम मनगुळी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दरोड्यानंतर आरोपी काही क्षणातच सोन्या-चांदीसह महाराष्ट्राच्या सीमेच्या दिशेने फरार झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी झळकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायाला गोळी लागल्याने तरुण जखमी
हलसंगी गावातील महादेव कांचागार यांच्या मालकीच्या सोन्याच्या दुकानावर दोन बुरखाधारी चोरटे दुचाकीवर येऊन सुमारे 205 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 किलो चांदी लुटून फरार झाले. याचवेळी शेजारच्या मोबाईल दुकानाचे मालक अनिल बसन्ना गलगली हे दरोड्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. बाजूलाच उभ्या असलेल्या 18 वर्षांच्या तरुणाच्या पायाला गोळी लागली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चांगली आहे. सध्या तो उपचार घेत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.