बनावट सोन्याचे बिस्किट देऊन लुटमार
कराड :
सोन्याची बनावट बिस्किटे देऊन वृद्ध महिलांकडील सोन्याचे खरे दागिने लुटण्राया बिहारच्या टोळीचा कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. तर पाचजण पसार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अटक केलेल्या चोरट्याकडून पोलिसांनी दीड तोळ्याची सोन्याची साखळी हस्तगत केली आहे.
विरेंद्र साहू (वय 32, मूळ रा. बिहार, सध्या रा. कराड) असे अटक केलल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील बेलवडे येथील अनिता अशोक तर्टे यांना दोन दिवसापूर्वी कराडच्या बसस्थानक परिसरात भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन त्यांची दीड तोळ्याची सोन्याची चेन लूटली होती. याबाबत अनिता तर्टे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह उपनिरीक्षक आंदलकर, धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, अमोल देशमुख हे या गुह्याचा तपास करीत असताना शिराळा व पलूसमध्येही अशाच चोरी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचला असता या गुह्यांमध्ये सहाजणांची टोळी असल्याचे समोर आले. या टोळीच्या कराड परिसरातील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी विरेंद्र साहू पोलिसांच्या हाती लागला. तर अन्य पाचजण पसार झाले. पळून गेलेल्या पाचजणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या टोळीने सातारासह सांगली जिह्यातही गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच अन्यही काही जिह्यात गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर तपास करीत आहेत.
पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी टोळीतील पाचजण घरातून बाहेर गेले होते. अर्ध्या तासापूर्वी पोलिसांनी छापा टाकला असता तर संपूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली असती. पोलिसांच्या हाती लागलेल्या विरेंद्र साहू यानेही पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पाठलाग करुन पकडण्यात आले. त्याच्याकडून गोल्ड पॉलिश, चांदी पॉलिश पावडर आणि सोन्यासारखे दिसणारे बिस्किट हस्तगत करण्यात आले आहे.