वाठार येथे पेट्रोल पंपावर दरोडा; सव्वा लाखाची रोकड लंपास
कराड :
आशियाई महामार्गावर वाठार (ता. कराड) येथील गणेश पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला चढवला. त्यानंतर कर्मचाऱ्याजवळील सुमारे सव्वा लाखाची रोकड घेऊन दुचाकीवरून पसार दरोडेखोर झाले. सोमवारी 10 रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाला आहे. परशुराम सिद्धार्थ दुपटे असे जखमी झालेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाठार गावच्या हद्दीत महामार्गालगत ऋषिकेश पांडुरंग गावडे यांच्या मालकीचा गणेश पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कर्मचारी परशुराम दुपटे येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत होते. दरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन युवक पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्या युवकांनी परशुराम दुपटे यांच्याकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घेतले. पेट्रोल भरून झाल्यानंतर दुचाकीवरती पाठीमागे बसलेल्या युवकाने दुपटे यांना पेट्रोलचे पैसे दिले. ते पैसे घेऊन दुपटे हे आपल्याजवळील बॅगमध्ये ठेवत असतानाच पाठीमागील युवकाने कोयता काढून दुपटे यांच्या अंगावर पायावर हातावर सपासप वार केले. ते वार चुकवत दुपटे यांनी तेथून पळ काढला. त्याच वेळी दरोडेखोराने दुपटे यांच्या हातातील एक लाख वीस हजार 935 रुपये रोकड असलेली बॅग हिसकावून दुचाकीवरून तेथून पलायन केले.
घटना घडल्यानंतर याबाबत पेट्रोल पंपाचे मॅनेजर निलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मॅनेजर निलेश तावरे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. दरम्यान महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे.