उचगाव परिसरात भुरट्या चोऱ्यांना ऊत
सततच्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत : पोलीस खाते निक्रिय, गस्त वाढवून तातडीने चोऱ्यांचा तपास लावण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव परिसरात चोऱ्यांचे सत्र सातत्याने सुरूच असून पोलीस खाते मात्र निक्रिय असल्याचे दिसून येत आहे. सततच्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे या भागातील नागरिक भयभीत झाले असून घरांना कुलूप लावून बाहेर जाणे आता धोकादायक असल्याचे समजून बाहेर जाणे टाळत आहेत. या परिसरातील उचगाव, सुळगा, बेनकनहळ्ळी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची,कोणेवाडी, बेकिनकेरे, अतिवाड या गावांतून अनेक भुरट्या चोऱ्यांना ऊत आला आहे. रात्री अथवा भरदिवसा घराला कुलूप असतील तर यावर पाळत ठेवून नेमके त्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोने-चांदीच्या दागिन्यांसह इतर वस्तूंची लूट करत असल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच गावालगत असलेल्या नवीन वसाहत भागातील नवीन बांधण्यात येत असलेल्या इमारती जवळील विद्युत मोटारी, पाण्याच्या टाक्या, लोखंड याचबरोबर नवीन इमारतीमधून नवीन आणलेल्या विद्युत फिटिंगच्या साहित्याचेही तसेच पाईप अशा अनेक वस्तूंच्या चोऱ्या सातत्याने होत आहेत. यासाठी या परिसरात येणाऱ्या काकती आणि वडगाव पोलीस स्टेशनच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून या भागात रात्रंदिवस गस्त घालावी. त्याचबरोबर झालेल्या अनेक चोऱ्यांचा तपास तातडीने लावावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
चोरांचा मोर्चा मंदिरांवर
मंदिरांमध्ये असलेल्या अनेक वस्तू त्याचबरोबर हमखास मंदिरामध्ये असलेल्या दानपेटीवर सातत्याने चोरांचे लक्ष असून या दानपेट्या फोडण्याचाही प्रकार अलीकडे वाढला आहे. दानपेटीमध्ये हमखास काही ना काही रक्कम मिळते यासाठी चोरांनी दानपेटीवर लक्ष ठेवले आहे.
मंदिर कमिटीकडून दानपेट्या महिन्याला रिकाम्या
मंदिरातील दानपेटीवर चोरांचे लक्ष असल्याने मंदिर जीर्णोद्धार कमिटीकडून महिन्याला एकदा त्या दानपेट्यातील रक्कम काढण्याचा निर्णय मंदिर कमिटीने घेतला आहे. यामुळे चोरांना हमखास मिळणारी दानपेटीतील रक्कम मिळणे मुश्कील झाले आहे. पोलीस खात्याने तातडीने या भागात झालेल्या चोरांचा तपास करावा आणि येथील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.