चोरी करून वृद्धेला पेटविले, १४ ग्रॅम सोने लंपास: चोरट्याबाबत संशय, पोलीस तपास सुरु
| प्रतिनिधी, आटपाडी
पहाटे लघवीसाठी उठलेल्या वृद्धेवर हल्ला करून तिचे दागिने लुटण्याचा आणि आरडाओरडा केल्याने तिच्यावर रॉकेल ओतून पेटविण्याचा खळबळजनक प्रकार शेटफळे (ता. आटपाडी) येथे घडला. वृद्धेच्या अंगावरील १४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पायातील चांदीचे पैंजण चोरट्याने लंपास केले. या घटनेत वृद्धा जखमी झाली आहे.
शेटफळेतील विठ्ठल जाधव यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांची आई मालन मारुती जाधव (वय ८५) या ३० जून रोजी पहाटे लघवीसाठी उठल्या होत्या. यावेळी बाहेरून परत घरात जाताना अज्ञात चोरटा त्यांच्या मागून घरात शिरला. त्याने वृद्धेला धक्का देऊन खाली पाडले. त्यांचा हात ओढला आणि त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमची सोन्याची माळ, पाच ग्रॅमचे सोन्याचे झुबे, ४ ग्रॅमची सोन्याची कानातील वेल आणि ३० भाराचे पैंजण जबरदस्तीने काढून घेतले.
या प्रकाराने वृद्धेने आरडाओरडा केला. त्यावेळी तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने चोरट्याने अंगावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या जखमी झाल्या आहेत.