For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोडगई-घोटगाळी परिसरात हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांत भीती

10:13 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोडगई घोटगाळी परिसरात हत्तींचा धुमाकूळ  ग्रामस्थांत भीती
Advertisement

चार हत्तींच्या कळपाचा चार दिवसांपासून वावर : वनविभागाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी

Advertisement

खानापूर : तालुक्यातील दक्षिण भागात कोडगई, घोटगाळी या परिसरात चार हत्तींचा कळप गेल्या चार दिवसांपासून गावांच्या आसपास धुडगूस घालत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींचा वनखात्याने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. गेल्यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने जंगलातील पाण्याचे स्त्रोत जवळजवळ पूर्णपणे संपले आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात हत्ती पुन्हा गावाजवळ येत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात कोणतेच पीक नसल्याने हत्ती अन्नाच्या शोधात गावाजवळ येत असून नारळ, केळीसह इतर झाडांची नासधूस करत आहेत. तसेच घोटगाळी, कोडगई परिसरातील जंगलातून गावांना जोडणारे संपर्क रस्ते आहेत. या रस्त्यावरच हत्तींचा वावर होत असल्याने नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करणे जोखमीचे ठरत आहे. काही ठिकाणी गावाजवळ शेतात तुरळक पाण्याचे साठे असल्याने हत्तीनी याच ठाकणी ठाण मांडल्याने हे हत्ती आता जंगलात जाणार नसल्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. वनखात्याने या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. याबाबत नागरगाळी विभागाचे वनाधिकारी जैन यांना विचारले असता आपल्या कर्मचाऱ्यांना हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन करू, आणि येत्या एक-दोन दिवसात हत्तीना पुन्हा जंगलात घालवण्यासाठी योग्य ते क्रम हाती घेतले जातील, असे सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.