मान्सूनपूर्व पावसातच शंभर कोटींच्या रस्त्यांची दाणादाण
कोल्हापूर :
शंभर कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरात करण्यात आलेल्या रस्त्यांची मान्सूनपूर्व पावसातच दाणादाण उडाली आहे. सर आली धावून.. डांबर गेले वाहून.. अशी परिस्थिती शहरातील रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांच्या कामांबाबत नागरिक तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आहेत. या रस्त्यांच्या बाजूला करण्यात येणारी गटर अपूर्ण असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे.

शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला डिसेंबर 2023 मध्ये मंजुरी देऊन 100 कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला. याच निधीतून शहरातील 16 रस्त्यांचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले. त्यातील अनेक रस्त्यांचे काम झाले. तरी अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर अजून शेवटचा डांबरीकरणाचा थर बाकी आहे. शहरात प्रामुख्यानं यादवनगरमध्ये माऊली पुतळापासून हुतात्मा पार्क या अवघ्या 100 मीटर अंतरावर दोन मोठे खड्डे पडले आहेत.
त्यात एका ठिकाणी रस्त्याच खचल्यासारखा झाला असल्याने दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.. त्यामुळे येथे अपघातांची शक्यता वाढली आहे. महाद्वार रोडसह शहरात अनेक ठिकाणी खडी टाकून काम केले आहे. मात्र, तेथील पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने गटारांअभावी पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरील खडी निघाली असून तेथे अपघाताची शक्यता आहे.