वडणगेतील रस्ते बनले काँक्रिटचे
कोल्हापूर / अवधुत शिंदे :
वडणगे (ता.करवीर) गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरु आहे. 1.40 कोटींच्या निधीतून माळवाडी ते पार्वती मंदिर आणि संघर्ष चौक ते इंदिरानगर या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल ते थळोबा चौक या रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती झाल्याने ग्रामस्थांची खड्डेमय रस्त्यांपासून सुटका झाली आहे. तसेच काँक्रिटीकरणामुळे रस्ते चांगले झाले असल्याने ग्रामस्थांमधून समाधानही व्यक्त होत आहे.
एक कोटी 40 लाखाच्या निधीतून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कामे झाले आहेत. अनेक वर्षापासून खराब झालेल्या रस्त्यांमुळे होणाऱ्या समस्यांचा सामना करत असलेल्या ग्रामस्थांची अखेर सुटका झाली आहे. गेल्या काही वर्षापासून वडणगेतील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची दूरवस्था झाली होती. रस्त्यांमध्ये खड्डे पडलेल्या ठिकाणी पावसाळयात पाणी साचल्याने खड्डे किती मोठा आहे हे समजत नव्हते. उन्हाळयात धुळीच्या त्रासामुळे प्रवास करताना ग्रामस्थांना मोठया समस्यांचा सामना करावा लागत होता. यामुळे ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी केली जात होती. अखेर लेकप्रतिनिधींच्या प्रयत्नांनी हा महत्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला.
- 1 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर
वडणगे गावातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. माळवाडी ते पार्वती मंदीर व संघर्ष चौक ते इंदिरा नगर या ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले.
पावसाळयात डांबरी रस्ता मोठया प्रमाणात खराब होत होता. मात्र आता सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना त्रास होणार नाही. पुढील काळात गावातील उर्वरित रस्त्यांची कामे देखील पूर्ण होतील.
- संगीता पाटील, सरपंच वडणगे ग्रामपंचायत