For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्पमधील रस्त्यांचे होणार नामकरण

12:52 PM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्पमधील रस्त्यांचे होणार नामकरण
Advertisement

आचारसंहितेमुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीला विलंब, हुतात्मा जवानांची नावे देणार

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रस्त्यांना दिलेली ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे बदलून त्या ठिकाणी स्वातंत्र्यसंग्रामातील थोर नेते, तसेच बेळगाव परिसरातील हुतात्मा जवानांची नावे देण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे 8 ते 10 रस्त्यांना नवीन नावे लवकरच मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कॅम्पमधील अनेक रस्त्यांना जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. ब्रिटिशांची राजवट संपून कित्येक वर्षे झाली तरी बेळगावमधील रस्त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांची नावे तशीच आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्त्यांच्या नाव बदलीचा प्रस्ताव रखडला होता. नूतन सीईओ राजीव कुमार, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे रस्त्यांना नवीन नावे दिली जाणार आहेत. कारगिल व इतर युद्धांमध्ये बेळगावमधील जवानांनी बलिदान दिले आहे. या बलिदानाचे स्मरण आजच्या पिढीला व्हावे, यासाठी कॅम्पमधील अनेक रस्त्यांना हुतात्मा जवानांची नावे दिली जाणार आहेत. मराठा लाईट इन्फंट्रीमधील हुतात्मा जवानांची यादी काढण्यात आली असून त्यांची नावे रस्त्यांना दिली जाणार आहेत. ओल्ड मोची लाईन या रस्त्याचे बाबू जगजीवनराम मार्ग असे नामकरण करण्यासाठीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे कॅम्पमधील रस्त्यांना लवकरच नवीन नावे मिळणार आहेत. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कॅन्टोन्मेंटची मासिक आढावा बैठक होऊ शकली नाही. 7 मे रोजी बेळगावमधील निवडणुका होणार असल्याने यानंतर मासिक बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सर्व नावांना मंजुरी दिली जाणार आहे.

मराठा इन्फंट्रीच्या मुख्यालयामुळे बनणार ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’

Advertisement

कॅम्पमधील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या हाय स्ट्रीट रस्त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ नाव देण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटचे सदस्य सुधीर तुपेकर यांनी लावून धरला. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या नावासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन देशाचे संरक्षण करणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्रीचे मुख्यालय बेळगावमध्ये असल्याने हाय स्ट्रीटला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव देण्याबाबत त्यांनी केंद्रीयस्तरापर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे हाय स्ट्रीटचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ असे नामकरण लवकरच होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.