For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंदिस्त गटारांमुळे सावंतवाडीतील रस्ते जलमय

बंदिस्त गटारांमुळे सावंतवाडीतील रस्ते जलमय
Advertisement

सावंतवाडी शहर / वार्ताहर : सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यांवरील गटारे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे तुंबल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी तसेच रस्त्यालगतचे दुकानदार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश आणि दुकानदारांच्या मालाचे नुकसान होत असून, ग्राहकही दुकानांकडे फिरकत नसल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक परिणाम होत आहे.

Advertisement

गोमंतक हॉटेल ते गवळीतिठा या मुख्य मार्गावरील गटारांची गेल्या दोन वर्षांत स्वच्छता व खोदाई न झाल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. याशिवाय चिटणीस नाका ते गवळीतिठा मार्गावरील गटारांवरील सिमेंटच्या फरशा तुटलेल्या असून, फुटपाथवर वाहनांचे पार्किंग, फेरीवाले व विक्रेत्यांचे अतिक्रमण असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील अनेक गटारे बंदिस्त असल्याने तसेच काही ठिकाणी इमारती व घरांमधील पावसाचे पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. सावंतवाडी-आंबोली, माजगाव-शिरोडा, कोलगाव व बांदा मार्गावरही अशीच परिस्थिती असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाने तातडीने गटारांची स्वच्छता, खोदाई आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.