नेमळेतील रस्त्यांची चाळण ; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
नेमळे : प्रतिनिधी
नेमळे गावातून जाणाऱ्या सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत .या रस्त्यावरून जाणारे शाळकरी विद्यार्थी , वाहनचालकांना रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नेमळे ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप करीत लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . दरम्यान , रस्ता दुरुस्त न झाल्यास येत्या ८ जून रोजी गावातील सर्व ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी समोर उपोषणास बसतील असा इशारा दिला आहे . नेमळे गावातून गेलेले तळवडे, मळगाव, कामळेवीर , हे ग्रामीण रस्ते झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आले आहेत . या ग्रामीण अंतर्गत रस्त्यांची खड्डे पडून अक्षरशः चाळण झाली आहे . त्यामुळे ह्या रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे . यावेळी नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, एकनाथ राऊळ, विक्रम पांगम,मिलिंद नेमळेकर तसेच इतर उपस्थित होते.