मोबाईल कंपन्यांनी केबलसाठी खुदाई केल्याने धामणी खोऱ्यातील रस्ते धोकादायक
ठेकेदारांचे रस्ता स्वच्छतेकडे दुर्लक्ष,धुरळाचे साम्राज्य, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केली जात नसल्याने जनतेतून संताप व्यक्त
म्हासुर्ली प्रतिनिधी
राधानगरी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील विस्तारलेल्या धामणी खोऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या बाजू पट्ट्यातून दोन खासगी मोबाईल कंपन्यांची नेटवर्क केबल टाकण्याचे काम सुरु असून मोठ्या प्रमाणात खुदाई केली आहे.परिणामी जागोजागी रस्त्यावर धुरळ्याच्या साम्राज्याबरोबर रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.तर संबंधित ठेकेदारांकडून रस्ता स्वच्छ करण्याबाबत व सुरक्षचे दृष्टीने उपाययोजना केली जात नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
धामणी खोरा प्रामुख्याने डोंगरदर्यांनी व्यापलेला असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून विकासाबाबत दुर्गम राहिलेला आहे. मात्र गेल्या दोन - चार वर्षांपासून या परिसरात शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून रस्ते बांधणी चांगल्या प्रकारे झाल्याने सर्व रस्ते डांबरी झाले आहेत.त्यामुळे येथील जनतेच्या दळणवळणाची सोय झाली आहे.
मात्र गेल्या दोन महिन्यापासून धामणी खोऱ्यात दोन खासगी मोबाईल कंपनीने आपल्या नेटवर्कची केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात चर खुदाई केली आहे. सदर खुदाईला शासनाच्या संबंधित बांधकाम विभागांची परवानगी घेतली असल्याचे समजते. मात्र खुदाई करताना संबंधित ठेकेदारांनी प्रवासी जनता व रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतलेली नाही. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूने लाल मातीचा धुरळा उडत असल्याने लोकांच्या आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला आहे.तर काही ठिकाणी खुदाई अपुरी ठेवली असल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
धामणी खोऱ्यातून सध्या मोठ्या प्रमाणात ऊसासह इतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून अशा रस्त्यावरून प्रवास करताना जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.तरी शासनाच्या संबंधित विभागांनी जनतेच्या व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ते स्वच्छ करण्याबरोबर मजबूत करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
गवशी - भित्तमवाडी रस्ता धोकादायक..!
धामणी नदीच्या दोन्ही तीरावरील गावांसह राधानगरी तालुक्याच्या शेवटच टोक असलेल्या गवशी परिसरातील गावांना जोडणारा गवशी - भित्तमवाडी दरम्यानचा रस्ता धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग आहे. मात्र हा रस्ता गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून डांबरी करण्यात आला आहे.मात्र सदर रस्ता तयार करताना नियमांना बगल देत अपूर्ण रुंदीचा केला असल्याने दुहेरी वाहतूक होण्यास अडथळा होत आहे. त्यातच सध्या मोबाईल कंपन्यांची केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खुदाई केल्याने बऱ्यापैकी रस्त्याच्या अस्तित्वच संपुष्टात आले असून रस्ता धोकादायक बनला आहे. याकडे संबंधित विभाग लक्ष देणार का असा प्रश्न जनतेतून व्यक्त होत आहे.