राज्योत्सवासाठी रस्ते बंद; शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
बेळगाव : राज्योत्सवासाठी शहरवासियांना वेठीस धरले जात आहे. शुक्रवारी सायंकाळी चन्नम्मा चौक परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्याने वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. कामावरून घरी निघालेल्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्योत्सव कोणाचा आणि गैरसोय कोणाची असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. राज्योत्सवासाठीचा धुडगूस शुक्रवारी दुपारपासूनच सुरू होता. लाईट्स, मंडप तसेच बॅनर लावण्यासाठी रस्ते बंद करण्यात येत होते. यामुळे शहराच्या दक्षिण भागातून उत्तर भागात जाण्यासाठी बराच कालावधी लागत होता. सायंकाळी 6 नंतर कार्यालये तसेच उद्यमबाग येथील कामगार घरी जाण्यासाठी निघाले परंतु राणी चन्नम्मा चौक येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. चारही बाजूने वाहने अडकल्याने नागरिकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी रस्त्यामध्येच बॅनरसाठी बांबू उभे करण्यात आले आहेत. यामुळे बस तसेच इतर मोठी वाहने धिम्म्यागतीने पुढे जात होती. खानापूरसह परगावी जाणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशिरापर्यंत वाहतुकीची कोंडी होत होती.