बेळगाव-अगसगे मार्गावर बससाठी रास्ता रोको
गेल्या सहा महिन्यांपासून बसफेऱ्या अनियमित असल्याने विद्यार्थी संतप्त : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : आश्वासनानंतर रास्ता रोको मागे
वार्ताहर/अगसगे
अगसगे बसच्या गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित फेऱ्या होत होत्या. यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देऊनदेखील परिवहन खात्याने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी सोमवार दि. 8 रोजी रास्ता रोको करून आंदोलन छेडले. यामुळे तब्बल दोन तास वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काकती सीपीआय सुरेश शिंगे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अगसगे बस अनियमित वेळेत येत असल्याकारणाने विद्यार्थी व ग्रामस्थांना दररोज नाहक त्रास होत होता. बसस्थानकावर दोन-तीन तास ताटकळत उभे राहावे लागत असे. सकाळी आठ वाजता येणारी बस रद्द केली होती. त्यामुळे बेळगावला कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पहाटे कामासाठी जाणाऱ्या कामगारांना मोठी अडचण निर्माण झाली होती. सध्या या भागामध्ये खासगी टेम्पोचा वावर देखील कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ बसवरच अवलंबून आहेत. मात्र बसच येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
याबाबत परिवहन मंडळाला अनेकवेळा ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य गुंडू कुरेन्नावर यांच्या नेतृत्वाखाली निवेदने दिली होती. यावेळी केवळ दोन-तीन दिवसात सुरळीत बसेस सोडण्यात येत होत्या. त्यानंतर पुन्हा बसेसच्या फेऱ्या बंद केल्या होत्या. याबाबत वारंवार डेपो मॅनेजर व संबंधित अधिकाऱ्यांशी बस नियमितपणे सोडण्याकरिता विनंती केली होती. मात्र परिवहन खात्याने याकडे साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. याबाबत संबंधित काकती पोलीस स्थानकाला निवेदन देखील दिले होते.
त्यामुळे काकती पोलीस सकाळी आठ वाजताच गावात दाखल झाले होते. गुंडू कुरेन्नावर यांचा नेतृत्वाखाली सकाळी गावच्या वेशीमध्ये आणि कलमेश्वर मंदिरासमोर बेळगाव-अगसगे या मुख्य रस्त्यावर बैलगाडी आडव्या लावण्यात आल्या होत्या व आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बेळगावमार्गे व हंदिगनूरमार्गे होणारी वाहतूक थांबल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची तीव्रता वाढताच काकती पोलीस स्थानकाचे सीपीआय सुरेश शिंगे घटनास्थळी दाखल झाले व परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलून यापुढे दररोज नियमित वेळेत बसेस सोडण्याची जबाबदारी मी घेतो. कृपया ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. अखेर विनंतीला मान देऊन ग्रामस्थांनी आपले आंदोलन 11 वाजता मागे घेतले. यावेळी ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य गुंडू कुरेन्नावर, माजी सदस्य परशराम रेडेकर, भैरू डोणकरी, विनायक रेडेकर, सिद्राय नागेरळ तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
बसफेऱ्या सुरळीत न झाल्यास कायमस्वरूपी रस्ता बंद करू!
गेल्या सहा महिन्यापासून अगसगे गावच्या काही बसफेऱ्या रद्द करून अनियमित वेळेत धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह बेळगावला कामाला जाणाऱ्या महिला व पुरुषांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या आंदोलन करून दोन चार दिवस बस सुरळीत करून पुन्हा बसफेऱ्या रद्द करून जर पुन्हा अनियमित सुरू केल्या तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार नाही व काकती पोलिसांना निवेदन देखील देणार नाही. बेळगाव-अगसगे हा मुख्य रस्ता बंद करून टाकू.
- गुंडू कुरेन्नावर, ग्रा. पं. सदस्य
