सावंतवाडी शहरातील रस्त्यांची कामे अखेर हाती
टिकेची झोड उठल्यावर पालिकेला जाग
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून नगरपालिका प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर चार महिन्यानंतर रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. एप्रिल-मे महिन्यात शहरातील बाजारपेठेतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पावसाच्या तोंडावर मुख्य बाजारपेठेत प्रचंड मोठे खड्डे पडल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. चंदू भवनसमोर तर रस्त्यावरील एका बाजूची खडीच उखडून गेली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत पालिकेला घेराव घातला होता. त्यावेळी सदर रस्ता ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्याची हमी मुख्याधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच शहरातील बऱ्याच रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत शहरातील नागरिक तसेच संघटनांनी आवाज उठवल्यानंतर आता पालिकेला जाग आली असून रस्त्यांची कामे ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्यात येत आहेत.