Satara News : जावली तालुक्यातील रस्ता काम संथगतीने सुरु; ग्रामस्थ संतप्त
आनेवाडी : प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सुरु असणाऱ्या जावली तालुक्यातील महिगाव ते गणपती माळ या रस्त्याला मंजुरी मिळून एक वर्ष होत आले परंतु अजून पर्यंत काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या बांधकाम अधिकायांना तक्रार केली तरी त्यात सुधारणा झालेली नाही. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
जावली तालुक्यातील मंजूर असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेचा ठेका जिल्ह्यातील नामांकित ठेकेदाराने घेतला आहे. त्याच्याकडून सब ठेकेदार नेमून काम दिले गेले, मात्र गेल्या एक वर्षापासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. या दोन किलोमीटरच्या रस्त्याकरीता १ कोटी ६२ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ऑक्टोबर २०२४मध्ये काम सुरु होऊन डिसेंबर २०२५ आले तरी काम पूर्ण नसून बांधकाम अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एवढा मोठा निधी देऊनही या निधीचा मुख्य ठेकेदार व सब ठेकेदार यांनी कामात दिरंगाई करीत आहेत. काम कधी आणि किती दिवसात पूर्ण होणार? याचे लेखी उत्तर अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदाराने द्यावे अन्यथा ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन आणि ठेकेदार व बांधकाम अधिकारी यांना काळ फासणार असल्याचे ग्रामस्थांनी व स्थानिकांनी सांगितले.