जांबोटी बसस्थानकावरील रस्त्याचे काम अर्धवट
वाहतुकीला अडथळा : वाहनधारकांची गैरसोय
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी बसस्थानकावरील रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या सहा महिन्यापासून अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त आहे. तसेच बाजूपट्ट्या तयार करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करण्यात आल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. जांबोटी बसस्थानकावरील रस्त्याचा समावेश बेळगाव-चोर्ला राज्य महामार्ग अंतर्गत होतो. सध्या राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण अंतर्गत मंजूर झालेल्या निधीमधून बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या दुरुस्ती व फेरडांबरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
मात्र या भागाचे मध्यवर्ती ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेल्या जांबोटी बसस्थानकावरील रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे, नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जांबोटी बसस्थानकावरील रस्त्याला गटारीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पावसाचे पाणी तसेच हॉटेल व इतर व्यावसायिकांनी सोडलेले सांडपाणी महामार्गावरून वाहत असल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत होती. शिवाय सांडपाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना देखील करावा लागत होता. याची दखल घेऊन गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण अंतर्गत जांबोटी बसस्थानकावर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 300 मीटर भुयारी गटारी बांधकामाचे काम हाती घेण्यात आले होते. जानेवारी महिन्यापर्यंत सदर काम पूर्ण करण्यात आले. परंतु गटारी बांधकामानंतर बसस्थानकावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे संबंधितांचे अद्याप दुर्लक्ष झाले आहे.
खडी टाकल्याने वाहतूक कोंडी
गेल्या महिन्याभरापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा बाजूपट्ट्या घालण्यासाठी तसेच रस्त्याची उंची वाढविण्यासाठी रस्त्याच्या बाजूने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदाई करून रस्त्यावर खडीचे ढीग व इतर साहित्य टाकण्यात आल्यामुळे नेहमी गजबजलेल्या या बसस्थानकावर मोठ्याप्मा णात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली आहे. सध्या या भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. मात्र रस्त्याच्या बाजूने खोदकाम केलेल्या जागेत मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. तसेच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे जांबोटी भागात मोठ्याप्रमाणात वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची रीघ लागते. मात्र जांबोटी बसस्थानकावरील खराब रस्त्यामुळे पर्यटकांची देखील गैरसोय झाली आहे. बसस्थानकावर हॉटेल व इतर व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र ग्राहकांना रस्त्याच्या दुतर्फा वाहने थांबविण्यासाठी रस्ता खोदाईमुळे जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकवर्ग जांबोटीत खरेदी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने, व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. तरी संबंधित कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून जांबोटी बसस्थानकावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेऊन होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.