अचानक रस्ता बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा
उद्यमबाग रोडवर रात्री उशिरापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी : अधिकारी-कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात संताप
बेळगाव : कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक शुक्रवारी सकाळपासून उद्यमबाग रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. खानापूर रस्त्यावर उद्यमबाग ओलांडण्यासाठी तब्बल तासभराचा कालावधी लागत होता. रात्री उशिरापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी अधिकारी, तसेच कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.
मागील 13 दिवसांपासून तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम सुरू होते. त्यामुळे या दिवसांमध्ये नागरिकांना दुसरे रेल्वेगेटमार्गे खानापूर रोड गाठावा लागला. त्यावेळीही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. गुरुवारी डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रात्रीपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
शुक्रवारी सकाळी अचानक उद्यमबाग रस्त्याच्या एका बाजूच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे एका बाजूच्या रस्त्यावरून ये-जा सुरू ठेवण्यात आली. कामानिमित्त खानापूर रोड मार्गे शहरात येणाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. केवळ सकाळीच नाहीतर सायंकाळीही अशीच तोबा गर्दी झाली होती. नोकरदार घरी परतत असल्यामुळे तिसरे रेल्वेगेटपासून बेम्को कॉर्नरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली.
... तर वाहतूक कोंडी झाली नसती
रस्ता डांबरीकरण करायचे होते तर त्याची पूर्वसूचना देणे गरजेचे होते. अचानक रस्ता बंद करून वाहतूक वळविल्याने प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कंत्राटदाराच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला. प्रशासनाने पूर्वसूचना दिली असती तर वाहतूक कोंडी झाली नसती अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.