आझाद गल्ली येथील रस्ता दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात
‘तरुण भारत’ वृत्ताची दखल, नागरिकांमधून समाधान
बेळगाव : आझाद गल्ली येथील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महानगरपालिकेला जाग आली. वर्षभरापासून रस्त्याची खोदाई करून काम अर्धवट टाकण्यात आल्याने नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने ‘तरुण भारत’चे आभार मानण्यात आले.
आझाद गल्ली परिसरात जलवाहिनी तसेच इतर कारणांसाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. त्यावेळी परिसरातील पेव्हर्स काढण्यात आले होते. काही पेव्हर्स निखळल्याने आझाद गल्ली, माळी गल्ली येथील नागरिकांना ये-जा करताना अडथळे येत होते. या परिसरात अनेक व्यावसायिक आस्थापने तसेच गोडावून असल्यामुळे नागरिकांची नेहमीच ये-जा असते. वर्ष उलटले तरी रस्त्याचे काम पूर्ण केले जात नसल्याने ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले.
गुरुवारी या विभागाच्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी तातडीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आझाद गल्ली परिसरात बोलावून घेतले. वेळेत काम पूर्ण न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला. खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारपासूनच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. येत्या आठवडाभरात इतर कामेही पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आझाद गल्ली, माळी गल्ली परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.