अलारवाड ब्रिजजवळील रस्त्यावर चर
महामार्गावरून शहरात येणाऱ्या वाहनांना अपघात : धोकादायक चर बुजविण्याची मागणी
बेळगाव : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या अलारवाड ब्रिजजवळ रस्ता मधोमध खचला आहे. यामुळे महामार्गावरून शहरात वेगाने येणारी वाहने अडकली जात आहेत. खचलेला रस्ता रात्रीच्या वेळी निदर्शनास येत नसल्याने अपघात होत आहेत. शहराच्या प्रवेशद्वारावरच अशाप्रकारे रस्ता खचला असल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांचे समस्यांनीच स्वागत होत असल्याचे दिसून येत आहे. जुने बेळगावनजीकच्या अलारवाड ब्रिज येथे राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येण्यासाठीचा रस्ता आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी एक वाहिनी घालण्यात आली होती. वाहिनी घातल्यानंतर त्यावर तात्पुरत्या स्वरुपात माती घालत डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सध्या हा रस्ता खचला आहे. त्यामुळे मातीचे ट्रक या चरीमध्ये रुतले जात असल्याने खड्डा वाढला आहे. चरीमध्ये माती टाकण्यात आली होती. परंतु, पावसामुळे ती इतरत्र पसरली आहे. रस्ता मोठा असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वेगाने वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे ही चर धोकादायक ठरत असून, प्रशासनाने वेळेत ही चर बुजवावी, अशी मागणी केली जात आहे.