खानापूर शहरांतर्गत रस्त्याचे मार्किंग पूर्ण
तहसीलदारांकडे लवकरच अहवाल देणार : नागरिक-आंदोलनकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
खानापूर : खानापूर शहरांतर्गातील रस्त्याचे मार्किंग सोमवारी आयोजित करण्यात आले होते. यासाठी सकाळी 10.30 वाजता भूमापन अधिकारी एम. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्मारक चौक ते जांबोटी क्रॉस दरम्यान असणाऱ्या आर. एस. क्रमांक 95/अ, 95/ब, 96/0, 96/5, 51, 49, 48, 97, 95 व 96 या मालमत्ता क्षेत्रांच्या सीमा चिन्हांकन आणि मोजणी प्रक्रिया सोमवारी करण्यात आली. पुढील आठ दिवसात या संपूर्ण रस्त्याच्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रस्ता मार्किंगच्यावेळी शहरातील नागरिकांनी आणि आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.
सुरुवातीला सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवस्मारक चौकापासून सर्वेक्षण आणि मार्किंगचे काम हाती घेतले. मात्र शिवस्मारक आवाराच्या बाजूला असलेल्या तालुका पंचायतीच्या दुकान गाळ्यांच्या ठिकाणी सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी चुकीचे मार्किंग केल्यामुळे यावेळी उपस्थित माजी नगरसेवक दिनकर मरगाळे, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, सुरेश जाधव, ईश्वर घाडी, गुड्डूसाब टेकडी, यशवंत बिरजे यासह अनेकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. यावेळी पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी आणि तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी योग्यप्रकारे सर्वेक्षण करून मार्किंग करण्याची सूचना केल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण आणि मार्किंगचे काम करण्यात आले.
यावेळी संपूर्ण 24 मीटर रस्त्याची रुंदी धरुन मार्पिग केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले. यावेळी वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार दुंडापा कोमार, मुख्याधिकारी संतोष कुरबेट, गंगाधर कांबळे, बांधकाम विभागाचे अभियंते संजय गस्ती, राजू जांबोटी, प्रेमानंद नाईक तसेच नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मऱ्याम्मा मंदिर करंबळ क्रॉस रस्त्याचे सर्वेक्षण करा
शहरांतर्गत असलेल्या रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात यावे, याची मागणी गेल्या काही महिन्यापासून लावून धरण्यात आली आहे. मात्र राजा छत्रपती स्मारक ते जांबोटी क्रॉस या रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र मऱ्याम्मा मंदिर ते करंबळ क्रॉस या रस्त्याचे संपूर्ण सर्वेक्षण होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार आणि भूमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून येत्या काही दिवसात या संपूर्ण रस्त्याचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी होत आहे.