सावगावातील ‘तो’ रस्ता नेहमीप्रमाणे वापरासाठी खुला करून द्या
ग्रामस्थ, पंच मंडळींसह शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी
बेळगाव : शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जमिनीची मूळ मालकांनी विक्री केली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. शेताकडे जाणारे शेतकरी, बैलगाडी व ट्रॅक्टरना रस्त्याअभावी ये-जा करणे अवघड झाले आहे. सरकारी नकाशात उल्लेख असलेला रस्ता पूर्वीप्रमाणे वापरासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवार दि. 6 रोजी सावगाव ग्रामस्थ आणि पंच मंडळींच्यावतीने तहसीलदार बसवराज नागराळ यांना देण्यात आले. सावगाव गावातील सर्व्हे नं. 668/1 आणि 268/2 या जमिनीशी जोडलेला एक संपर्क रस्ता आहे. त्याचा उल्लेख सरकारी नकाशातही आहे.
मात्र ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला आहे ती जमीन मूळ मालकांनी विकली आहे. मूळ मालक शंकर मारुती पाटील आणि राजू लक्ष्मण पाटील हे दोघेजण सदर रस्त्याबद्दल तक्रार करीत आहेत. त्यामुळे गावातील नागरिक व शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे. रस्ता नसल्याने शेतकरी, बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन जाणे अशक्य बनले आहे. रस्ता बंद करण्यात आला असल्याने नागरिक व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सदर रस्ता वापरासाठी उपलब्ध करून देण्यात यावा आणि शंकर पाटील व राजू पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य गणपत पाटील, मोहन कांबळे, राजू सटवाई, सुनील कोरजकर, कुमार पाटील, नारायण मोरे, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.