एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर मोरेवाडी मार्गावर खड्ड्यात रस्ता
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
एसएससी बोर्ड ते मोरेवाडी नाका हा उपनगरातील रस्ता वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मुळात हा रस्ता अरुंद असून सद्या या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या चार दिवसापासून पाऊस पडल्यामुळे खड्डयात टाकलेली खडी वाहून गेली आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांना आपली हाडे खिळखिळी करुन घ्यावी लागणार आहेत. वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना या रस्त्याचा अतिशय त्रास होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम केले जात नाही.
कोल्हापूर शहरातील चांगले असलेल्या रस्त्यावर पुन्हा खडी-डांबर टाकून रस्ता केला जात असल्याचे दाखवले जात आहे. मात्र उपनगरातील मुख्य रस्त्यांचे दुखणे कायम आहे. उपनगरातील अंतर्गत रस्ते करण्यात येत आहेत. मुख्य रस्ते न करण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यापैकी एसएससी बोर्ड ते मोरेवाडी नाका हा रस्ता आहे. गेल्या काही वर्षापासून हा रस्ता केलेला नाही. प्रत्येकवेळी डागडुजी केली जाते परंतू तीन चार महिन्यात पुन्हा खड्डे जैसे थे असतात.
गेल्या वर्षी गॅस पाईपलाईनच्या कामासासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुदाई करण्यात आली होती. पण त्याचे रिस्टोरेशन करण्यात आले नाही. रस्त्याच्या साईडपट्या आणि मध्यभागीही मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन नेमके कुठून चालवायचे हा प्रश्न आहे. सद्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे स्कूल बसेस आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची रहदारी नाही. या रस्त्यातील खड्ड्यामुळे या वाहनांना अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच राजेंद्रनगर, मोरेवाडी, आरकेनगर, आदी भागातील लोकांची नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांना या रस्त्याचा अतिशय त्रास होत आहे.
- रिक्षाचालकांचा आंदोलनाचा इशारा आणि डागडुजी
तीन महिन्यापूर्वी राजेंद्रनगर येथील रिक्षा चालकांनी एसएससी बोर्ड ते मोरेवाडी नाका या रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी दुसऱ्याच दिवशी महापालिकेने या मार्गावर खडी-मुरुम टाकून खड्डे भरले. पण खडी मुरुम किती दिवस टिकणार. काही दिवसात खडी व मुरुम निघून गेला आणि पुन्हा खड्डे तयार झाले आहेत.
- प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
आम्ही रिक्षाचालकांनी एसएससी बोर्ड ते मोरेवाडी या रस्त्याच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधून डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अद्यापही रस्ता झाला नाही. मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का?
समाधान बनसोडे, रिक्षाचालक
- खड्यामुळे मणक्याचा त्रास
एसएससी बोर्ड ते मोरेवाडी या रस्त्यावर असलेल्या मोठया खड्डृdयामुळे गाडी कुठून चालवायची असा प्रश्न आहे. खड्ड्यातून गाडी जात असल्यामुळे मणक्याचा त्रास झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
सावळा वाघमारे, प्रवासी