मंगाईनगर तलावामध्ये जनावरांसाठीचा रस्ता बंद
शेतकऱ्यांची गैरसोय, कंत्राटदाराची घेतली भेट
बेळगाव : मंगाई नगर वडगाव, येथील तलावांचे सुशोभिकरणाचे काम महापालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे जनावरांना ये-जा करण्यासाठीचा रस्ता बंद झाला असून यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हा रस्ता पुन्हा खुला करून जनावरांची सोय करावी, अशी मागणी वडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मनपा कंत्राटदारांकडे केली.मंगळवारी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांची व्यथा पटवून दिली. वडगाव-जुने बेळगाव परिसरात अनेक शेतकरी आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांची जनावरे मंगाई नगर येथील तलावांमध्ये पाणी पिण्यासाठी जात असत. परंतु महापालिकेकडून सुशोभिकरणाचे काम सुरू झाल्याने तलावामध्ये जनावरांना उतरण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन महिन्यांपूर्वी महापालिका अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली होती. यावेळी त्यांनी कंत्राटदाराला सूचना दिल्या. त्यानंतरही रस्ता बंदच असल्याने मंगळवारी शेतकऱ्यांनी कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांना रस्ता खुला करण्याची विनंती केली. यावेळी हनुमंत बाळेकुंद्री, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, संतोष टोपगी, सुशांत तरळेकर, राजू जुवेकर, बाळू धामणेकर, चांगदेव धामणेकर, बंटी सायनेकर यासह इतर सदस्य उपस्थित होते.