आंबा घाटात पुन्हा धोक्याची घंटा; विसावा पॉईंटजवळ रस्ता खचला, एकेरी वाहतूक सुरू
आंबा: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटातील ओझरेखिंड आणि विसावा पॉईंटदरम्यानच्या धोकादायक वळणावर पुन्हा रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुना संरक्षक कठडा दरीत कोसळल्यानंतर रस्त्याची बाजूपट्टीही खचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी बॅरिकेटर्स उभारत एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी ओझरेखिंड परिसरातील संरक्षक भिंत कोसळून रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या होत्या. त्या घटनेमुळे घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता विसावा पॉईंटजवळील आणखी एका ठिकाणी सुमारे ५० फूट लांबीचा संरक्षक कठडा खोल दरीत कोसळला आहे. परिणामी रस्त्याची बाजूची पट्टीही दरीत गेल्याने नव्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी केवळ बॅरिकेटर्स लावून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. उर्वरित अवघ्या आठ फूट रुंदीच्या रस्त्यावरून एसटी बस, चारचाकी आणि अन्य वाहने धोकादायक परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहेत. मात्र कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ओझरेखिंड येथे रत्नागिरी एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलिसांचे पथक गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीवर नियंत्रण ठेवत आहे. मात्र नव्याने खचलेल्या वळणावरही स्वतंत्र पथक नियुक्त करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. दोन दिवसांपासून ही धोकादायक स्थिती कायम असतानाही संबंधित विभाग आणि ठेकेदाराकडून अपेक्षित तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.
विसावा पॉईंटजवळील हे वळण मुळातच अरुंद असून खोल दरीच्या काठावर असल्याने येथे अपघाताचा धोका अधिक आहे. पावसामुळे मातीची धूप वाढत असताना दाट धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे रात्रीच्या वेळी धोका आणखी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संरक्षणात्मक बांधकाम हाती घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि शक्यतो मुसळधार पाऊस आणि दाट धुक्याच्या काळात रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.