नेहरूनगरातील रस्त्यावर भगदाड
स्मार्ट सिटी कामांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह
बेळगाव : नेहरूनगर, तिसरा क्रॉस येथे रस्त्यामध्येच भगदाड पडल्याचा प्रकार रविवारी समोर आला. रस्त्याच्या खालील माती खचल्याने तब्बल 5 ते 6 फूट खोल भगदाड पडले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नेहरूनगर येथील हा रस्ता वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या परिसरात हॉस्पिटल, वसतीगृह तसेच डी-मार्ट असल्यामुळे नागरिकांची नेहमी ये-जा असते. त्याचबरोबर अवजड वाहनेही या मार्गावरून वाहतूक करीत असतात. अशातच 5 ते 6 फूट खोल भगदाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. रात्रीच्या वेळी भगदाड पडले असते तर मोठा अपघात घडला असता. त्यामुळे अधिवेशनापूर्वी हे भगदाड बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.