Ro Ro Care Seva: ... अखेर पाच वाहनांसह धावली रो-रो कार सेवा, पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद
हलक्या वजनाची वाहने वाहून नेण्यासाठी रो-रो कारची सुविधा उपलब्ध करून दिली
By : राजू चव्हाण
खेड : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार शनिवारी कोलाड- नांदगाव वेर्णादरम्यान देशातील पहिलीवहिली 'रो-रो' कार सेवा झालेल्या बुकिंगनुसार अवघ्या ५ वाहनांसह घावली. या सेवेला गणेशभक्तांचा पहिल्याच दिवशी थंडा प्रतिसाद लाभल्याने ही सेवा पुढे कितपत सुरू राहील, याचाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गणेशभक्तांना खडतर प्रवासातून दिलासा देण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने प्रथमच त्यांची हलक्या वजनाची वाहने वाहून नेण्यासाठी रो-रो कारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या सेवेसाठी कमीत कमी १६ वाहनांची नोंद होणे आवश्यक आहे.
परंतु अवघ्या पाच जणांनीच बुकिंग केल्याने कोकण रेल्वे प्रशासन कोंडीत अडकले होते. तरीही रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार पहिल्या दिवशी अवघ्या ५ वाहनांसह कोलाड-नांदगाव-वेर्णादरम्यान रो-रो सेवा चालवत घोषणेची पूर्तता केली आहे. रो-रो कार सेवेचे आकारण्यात येणारे भाडे पाहता 'नाकापेक्षा मोती जड' अशीच स्थिती आहे.
ही सेवा चाकरमान्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसायला लावणारी व तितकाच मनस्तापही सहन करायला लावणारी असल्याचा सूर आळवत्ता जात आहे. कोकण रेल्वे प्रशासनही पेचात आहे. यापुढील सेवेसाठी आरक्षणाची कमी नोंदणी झाल्यास सेवेच्या फेऱ्या रद्द करण्यात येतील, असेही कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे रेल्वे प्रशासनाने कार सेवेची घोषणा करुन नेमके काय साध्य केले, असा सवाल उपस्थित होत आहे.
'रो-रो' कार सेवेचा प्रयोग गणेशोत्सवात उचित नाहीच
'रो-रो' कार सेवेचा प्रयोग गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात न करता नाताळच्या सुट्टीत करायला हवा होता. या सेवेऐवजी आणखी प्रवासी गाड्या चालवता आल्या असत्या तर २४ डब्यांच्या प्रवासी गाडीत किमान २ हजार प्रवासी गावी आले असते. ज्यांच्याकडे खासगी वाहने नाहीत, त्यांच्या सोयीसाठीच रेल्वे मार्ग बांधलेला असताना आणि वाढीव प्रवासी गाड्यांसाठी क्षमता नसताना त्यावर पुन्हा खासगी गाड्यांची वाहतूक करणे योग्य नाही, असे मत रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी व्यक्त केले.