आर एन वंदना टेक्स्टाईलचा आयपीओ 28 ला होणार खुला
नवी दिल्ली :
एन आर वंदना टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा आयपीओ 28 मे रोजी सबक्रीप्शनकरता खुला होणार असून 30 मे रोजी बंद होणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 61.98 लाख समभाग विक्रीकरता सादर करणार असून 27.89 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कंपनीचे समभाग 4 जून रोजी एनएसई एसएमई वर सूचीबद्ध होणार असून 42 ते 45 रुपये प्रति समभाग अशी समभागाची किंमत निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओकरता अर्ज करायचा झाल्यास कमीत कमी 3 हजार समभागांसाठी अर्ज करावा लागणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी एक लाख 26 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.
कंपनीबद्दल बोलू काही...
एन आर वंदना टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना 1992 मध्ये झाली आहे. कोलकत्तामध्ये या कंपनीचे मुख्यालय असून कापड उद्योगामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. साडी, सलवार सूट आणि बेडशीट यांचे उत्पादन घेण्यासोबतच डिझाईन आणि विक्रीचे कार्य कंपनी करते. वंदना आणि तान्या या दोन ब्रँड नावासह आपली उत्पादने कंपनी बाजारात विकते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 220 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.