आरके नगर चौकातील अतिक्रमणावर हातोडा; टपरी चालकांची सामंजस्याची भूमिका
पाचगाव वार्ताहर
आर के नगर मुख्य चौकातील सुमारे 40 टपरी धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेत सामंजस्याची भूमिका घेतली. यामुळे आर के नगर चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोरेवाडी ते मंडलिक बोअरपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आर के नगर मुख्य चौकातील टपरीधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी ट्रॅक्टर,जेसीबी सह आर के नगर मुख्य चौकात अतिक्रमण काढण्यासाठी आले. यावेळी अधिकाऱ्यांनी टपरी धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या अन्यथा दुपारनंतर अतिक्रमण जेसीबी द्वारे काढण्यात येईल अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी काही टपरीधारकांनी किरकोळ विरोध केला. मात्र टपऱ्या काढाव्या लागणार हे लक्षात आल्यानंतर टपरी धारकांनी आपापले अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळपर्यंत बहुतांशी टपरी धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले.
व्यवसाय उध्वस्त, उदरनिर्वाहाचा प्रश्न
आर के नगर चौकातील बहुतांशी टपरी धारकांचा उदरनिर्वाह दररोज केलेल्या छोट्या व्यवसायातूनच होत होता. हातावर पोट असणाऱ्या टपरी धारकांचा व्यवसाय उध्वस्त झाल्यामुळे या टपरी धारकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न डोळ्यासमोर आवासून उभा राहिला आहे. सुमारे पंधरा वर्षापासून ज्याच्यावर आपले कुटुंब चालले तो व्यवसाय उध्वस्त झाल्याचे पाहताना अनेक टपरी धारकांचे डोळे डोळे पानावले होते.
कर्जाचे हप्ते भरायचे कसे?
अनेक टपरीधारकांनी मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, दवाखाना अशा विविध कारणांसाठी कर्ज घेतले आहे. मात्र आता व्यवसाय बंद झाल्याने या कर्जाचे हप्ते भरायचे कसे?असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
अतिक्रमण विरोधी कारवाई ने तरुणांचे स्वप्न हिरावून घेतले......
अनेक तरुण रस्त्याकडेला छोटा व्यवसाय करून आपल्या कष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत होते. अतिक्रमण विरोधी कारवाईतून शासनाने या तरुणांचे स्वप्न हिरावून घेतले आहे. अशी भूमिका एका टपरीधारक युवकाने मांडली.
टपरी धारकांचे पुनर्वसन करा
सुमारे 40 टपरीधारकांचे कुटुंब आर के नगर चौकातील व्यवसायावर चालत होते. दररोज कष्ट करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या सुमारे 40 कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने अशी कुटुंबे उघड्यावर न आणता या व्यवसायिकांना योग्य त्या ठिकाणी जागेची आखणी करून द्यावी व त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी युवक काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे अध्यक्ष मयुरेश पाटील यांनी केली.
उद्याची चूल पेटणार कशी?
अनेक टपरी धारकांचा उदरनिर्वाह दररोज होणाऱ्या व्यवसायातूनच होत होता. उद्यापासून व्यवसाय बंद झाल्याने घरातील लोकांना खायला काय द्यायचे आणि उद्याची चूल पेटवायची कशी? अशी व्यथा टपरीधारकांनी व्यक्त केली.
सुमारे दहा जणांना मिळत होते टपऱ्यांचे भाडे
परिसरातील काही जणांनी अतिक्रमण करून टपऱ्या घातल्या होत्या आणि त्या भाड्याने दिल्या होत्या. अतिक्रमण काढल्याने रस्त्याकडेच्या सरकारी जागेवर भाडे मिळवणाऱ्यांचे भाडे बंद झाले.